मुंबई, (प्रतिनिधी) २४ फेब्रुवारी - जलजीवन मिशन रेट्रोफिटिंग योजनेअंतर्गत लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २६.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लासलगाव विंचूरसह १६ गावांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाईल. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतरही जर लासलगाव सारख्या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात होऊ शकला नाही तर लासलगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल अशी माहिती पाणी पुरवठा राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. आज महाराष्ट्र विधान परिषद नियम १०१ अन्वये आमदार पंकज भुजबळ यांनी लासलगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. त्यावरील उत्तरात पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर दिले.
नियम १०१ अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही आशिया खंडातील कांद्याची अग्रगण्य बाजारपेठ असून हे शहर झपाट्याने विकसित होत आहे. गेल्या १५ वर्षांत येथील लोकसंख्या तिपटीने वाढून ती ३० हजारांच्या वर गेली आहे. सध्या लासलगाव शहरासाठी १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी दिले जात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लासलगाव साठी अत्यंत अपुरे आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे हा पुरवठा वारंवार खंडित होत असतो. अनेकदा नागरिकांना काही दिवस पाण्याविना राहावे लागत लागते. प्रसंगी जन सामान्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे लासलगाव शहरासाठी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शहरापासून १० कि.मी.अंतरावर असलेल्या 'खडक माळेगाव धरण' येथून स्वतंत्र जलवाहिनी टाकून नवीन पाणीपुरवठा योजना राबवणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.
या लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, जलजीवन मिशन रेट्रोफिटिंग योजनेअंतर्गत लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २६.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेच्या दुरुस्तीचे काम अतिंम टप्प्यात असून योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लासलगाव विंचूरसह १६ गावांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. मात्र तरी देखील लासलगाव सारख्या मोठ्या गावांचा विस्तार बघता पाणी पुरवठा मुबलक होऊ शकला नाही तर स्वतंत्र योजना राबविण्यासाठी शासन सकारात्मक विचार करेल. तसेच या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लवकरच बैठक घेऊन मार्ग काढला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.