मुंबई, (प्रतिनिधी) २४ फेब्रुवारी - आगामी राजकीय समीकरणे आणि संघटनात्मक मजबुतीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी महाराष्ट्रातील आपल्या नव्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली. यामध्ये जुन्या-जाणत्या नेत्यांना संधी देतानाच अनेक तरुण चेहऱ्यांवर मोठी जबाबदारी सोपवून भाजपने आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी केल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रमुख नियुक्त्या आणि 'बढती'
या नव्या निवडींमध्ये नवनाथ बन यांची भाजपच्या 'मुख्य प्रवक्ते' पदी वर्णी लागली असून, त्यांच्याकडे पक्षाची बाजू मांडण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरचे कृष्णराज महाडिक यांची 'भाजप युवा मोर्चा'च्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करून पक्षाने तरुण मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रा वाघ (महिला मोर्चा) आणि योगेश टिळेकर (ओबीसी मोर्चा) यांनी आपली पदे कायम राखली आहेत.
राजकीय पुनर्वसन आणि नवीन चेहरे
उपाध्यक्ष पदाच्या यादीत माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. तसेच गोपीचंद पडळकर आणि केशव उपाध्ये यांनाही उपाध्यक्ष म्हणून मोठी संधी देण्यात आली आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:
| पद | नाव |
| मुख्य प्रवक्ता | नवनाथ बन |
| प्रदेश उपाध्यक्ष | अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील, अर्चना पाटील चाकूरकर |
| सरचिटणीस | निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे, योगेश सागर |
| चिटणीस | मंगेश चव्हाण, संजय कुटे, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी, भैरवी घाक |
| युवा मोर्चा अध्यक्ष | कृष्णराज महाडिक |
| महिला मोर्चा अध्यक्ष | चित्रा वाघ |
| ओबीसी मोर्चा अध्यक्ष | योगेश टिळेकर |
| कोषाध्यक्ष | मिहिर कोटेचा |
"कार्यकर्ता सक्षम आहे, पण संधी मर्यादित"
"भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या वाटचालीत योगदान देत असतो. प्रदेश पदाधिकारी म्हणून काम करताना अत्यंत मर्यादित संधी देता येते. ज्यांना या यादीत स्थान मिळालेले नाही, त्यांना आगामी काळात वेगवेगळ्या आयामांच्या माध्यमातून कामाची संधी दिली जाईल," असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
या नियुक्त्यांमध्ये प्रामुख्याने विभागवार समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपने केला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही 'टीम' मैदानात उतरवण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस,12 चिटणीस, कोषाध्यक्ष, सह कोषाध्यक्ष, मुख्य प्रवक्ता, विविध मोर्चाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. जुन्या आणि नव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय संघटन मंत्री बी. एल.संतोष, सह संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रमुख नेते यांच्याशी चर्चा केल्यानंतर या कार्यकारिणीची घोषणा केल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
यावेळी, चव्हाण म्हणाले की पाठोपाठ लागलेल्या निवडणुकांच्या आचार संहितेमुळे कार्यकारिणीची घोषणा लांबणीवर पडली होती. निवडणुकांची धामधूम संपल्यानंतर भाजपाला बळकटी देऊन भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी नव्या कार्यकारिणीची गरज लक्षात घेऊन घोषणा करण्यात आली आहे.
?s=20