पर्यटनाचा आनंद ठरला काळ... महाराष्ट्रातील ७ आयटी इंजिनिअर्सचा समुद्रात बुडून मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 22-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २२ फेब्रुवारी - सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या महाराष्ट्रातील तरुण आयटी इंजिनिअर्सवर काळाने घाला घातला आहे. चेन्नईजवळील कांततूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेल्या १५ तरुणांचा गट मोठ्या लाटेसोबत ओढला गेल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह हाती लागले असून, मृतांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील तरुणांचा समावेश आहे.

सेल्फी घेताना ओढवला प्रसंग
मिळालेल्या माहितीनुसार, 'कॉग्निझंट' (Cognizant) या नामांकित आयटी कंपनीत इंटर्नशिपसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १५ तरुण चेन्नई येथे गेले होते. सुट्टी असल्याने हे सर्वजण चेन्नई-पाँडेचेरी रोडवरील कांततूर येथील बीचवर पर्यटनासाठी गेले होते. समुद्र शांत वाटत असतानाच अचानक १० ते १५ फुटांच्या उंच लाटा उसळल्या. यावेळी सेल्फी घेत असताना हा संपूर्ण गट लाटांच्या विळख्यात सापडला आणि ओढला गेला.

मृतांमध्ये भंडारा, नागपूर आणि नांदेडच्या तरुणींचा समावेश
स्थानिक प्रशासन आणि मराठी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. यामध्ये ४ मुले आणि ३ मुलींचा समावेश आहे. मृतांमध्ये भंडारा येथील मयुरी चौधरी, नागपूरची एक तरुणी आणि नांदेडच्या एका तरुणीची ओळख पटली आहे. इतर मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, हे सर्व तरुण विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश भागातील रहिवासी असल्याचे समजते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीने मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला आहे. त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून शोधमोहीम वेगाने राबवण्याची विनंती केली. तसेच, महाराष्ट्रातील पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
"चेन्नईतील ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही तामिळनाडू प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू असून, मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार सर्व आवश्यक व्यवस्था करत आहे."
— देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

मदत आणि शोधकार्य सुरू
स्थानिक प्रशासनाकडून समुद्रात मोठी शोधमोहीम राबवली जात आहे. काही तरुणांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकाश गाडे यांनी या दुर्घटनेबाबत माहिती दिली असून, राज्य सरकारकडून पीडित कुटुंबांशी संपर्क साधला जात आहे. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात आणि महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.