शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारची मोठी घोषणा... या १५ सेवा मिळणार एकाच ठिकाणी...

Share:
Main Image
Last updated: 19-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १९ फेब्रुवारी - शिवजयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. महसूल विभागातर्फे संपूर्ण राज्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' राबवण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या अभियानांतर्गत पुढील दोन महिन्यांत राज्यातील सर्व मंडळ मुख्यालय, नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर ६ विशेष शिबिरे आयोजित केली जाणार असून, प्रलंबित कामांचा निपटारा 'ऑन द स्पॉट' केला जाणार आहे.

एकाच छताखाली १५ हून अधिक सेवा
या अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महसूल विभागाशी संबंधित १५ महत्त्वाच्या सेवा एकाच दिवसात मार्गी लावल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश असेल:
दाखले व प्रमाणपत्रे: उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रीमीलेअर आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखल्यांचे वाटप.
जमीन अभिलेख: प्रलंबित फेरफार, ७/१२ उताऱ्यांमधील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप.
शेतकरी योजना: पीएम किसान नोंदणी, ॲग्रीस्टॅक, ई-मोजणी अर्ज आणि पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश.
इतर सेवा: घरांसाठी पट्टे वाटप, अकृषिक (NA) परवानगी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ आणि तुकडेबंदी प्रकरणांचा निपटारा.

अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी स्तरावर समित्या
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष स्वतः महसूलमंत्री असून, त्यात महसूल राज्यमंत्र्यांसह विधान परिषदेचे १० आमदार सदस्य म्हणून कार्यरत राहतील. ही समिती डेटा मॉनिटरिंग, फीडबॅक सिस्टीम आणि धोरणात्मक निर्णयांचा आढावा घेणार आहे.

Advertisement

असे असेल अभियानाचे वेळापत्रक
नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा यासाठी महसूल विभागाने स्पष्ट वेळापत्रक जाहीर केले आहे:

मंडळ स्तरावर पूर्व तयारी : १८ फेब्रुवारी ते ५ मार्च
मार्च महिन्यातील शिबिरे: ७ मार्च आणि १४ मार्च
एप्रिल महिन्यातील शिबिरे: १० एप्रिल आणि १७ एप्रिल
मे महिन्यात नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावर शिबिरे: ८ मे आणि १५ मे

"हे अभियान केवळ कागदोपत्री नसून, प्रत्यक्ष लोकांच्या दारापर्यंत महसूल यंत्रणा नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेषतः शेतमजूर आणि विद्यार्थ्यांची कामे विनासायास व्हावीत, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे."
— चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

Comments

No comments yet.