नाशिकमध्ये अपघातांचे सत्र सुरूच... तिघांचा बळी...

Share:
Main Image
Last updated: 19-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ फेब्रुवारी - नाशिक शहर आणि परिसरात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या काही दिवसांत झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये तीन तरुण दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बळी मंदिर उड्डाणपूल, हिंगणवेढे आणि आडगाव परिसरात हे अपघात झाले असून, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

१. उड्डाणपुलावर नियंत्रण सुटले; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
पहिली घटना महामार्गावरील बळी मंदिर परिसरातील उड्डाणपुलावर घडली. मूळचा वडनेर भैरव (ता. चांदवड) येथील रहिवासी असलेला ओमसाई राजेंद्र सलादे (२०) हा मंगळवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून द्वारकाकडे जात होता. उड्डाणपुलावरून जाताना वेगावरील नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी पुढे जाणाऱ्या ट्रकवर जोरात आदळली. या भीषण अपघातात ओमसाई गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉ. केतन गांधी यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

२. हिंगणवेढे परिसरात अज्ञात वाहनाची धडक; एकलहऱ्याचा रहिवासी ठार
दुसरी घटना नाशिकरोड-एकलहरा मार्गावरील हिंगणवेढे परिसरात घडली. रविंद्र मारुती मोरे (३९, रा. देशमुख कॉलनी, एकलहरे) हे सोमवारी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून घराकडे जात होते. सोलर प्लांट परिसरात पाठीमागून आलेल्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला. मोरे यांचा मित्र सूरज अष्टेकर याने त्यांना तातडीने बिटको रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. नाशिकरोड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

३. आयशर ट्रकची दुचाकीला समोरासमोर धडक; पेठचा तरुण दगावला
तिसरी घटना गुरुवारी रात्री बळी मंदिर परिसरातच घडली. विलास हिरामण राऊत (३३, रा. मोहाचापाडा, पेठ) हे दुचाकीवरून प्रवास करत असताना यश लॉन्सकडून येणाऱ्या आयशर ट्रकने (MH 15 BG 5351) त्यांना समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हवालदार राजूळे अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.