धुळे, (प्रतिनिधी) १९ फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशात राज्यक्रांती घडविली, तर महात्मा फुले यांनी समाज क्रांती घडविली. आजचा कार्यक्रम म्हणजे सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्र विचारांचा संगम होय. छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे, लोककल्याणकारी राजा होते. त्यांनी शेतकऱ्यांचा विचार केला. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि महात्मा फुले–सावित्रीबाई फुले स्मारक हे केवळ पुतळे किंवा वास्तू नसून ते समाजाला प्रेरणा देणारी मूल्यांची केंद्रे आहेत असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महापौर मायादेवी परदेशी, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राघवेंद्र भदाणे, आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भदाणे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते दूरदृष्टीचे राज्यकर्ते, लोककल्याणकारी शासक आणि स्वराज्याचे महान शिल्पकार होते. त्यांनी “हिंदवी स्वराज्य” ही संकल्पना मांडून सर्वसामान्य जनतेचे राज्य उभारण्याचा संकल्प केला. त्यांच्या स्वराज्यात जात, धर्म, पंथ यापेक्षा माणुसकीला प्राधान्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून महाराजांनी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी मोडून काढली. समता, बंधुता स्थापित केली. शिवरायांचे कार्य म्हणजे शहाजीराजे व जिजाऊंचे विचार कृतीत आणणारे शिवकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शिवाजी महाराजांचे सैन्य कोण होते, हे सगळे कष्टकरी, शेतकरी, मजुर, अलुतेदार, बलुतेदार सगळा बहुजन वर्ग, त्यामुळे महाराज लढाई सोबतच या सर्वांच्या दोन वेळच्या जेवणाची अगोदर काळजी घ्यायचे.महाराज हे खऱ्या अर्थाने ‘बहुजन प्रतिपालक’ होते. त्यांनी अस्पृश्यता, भेदभाव आणि शूद्रता मानली नाही. त्यांच्या सैन्यामध्ये अठरापगड जाती-धर्माचे सैनिक आढळतात. ‘महाराजांचे सैनिक हे बहुजन समाजातील आहेत. त्यांनी मराठा क्षत्रियांबरोबरच रामोशी, कोळी, सोनकोळी, मुस्लीम, बेरड, महार, मांग, माळी यासारख्या जातींमधून व शेतकऱ्यांमधून आपल्या सैनिकांची नेमणूक केली. स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात सर्वधर्मीयांना समान स्थान होते. सर्वच धर्मांचा आदर होत असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, समाजातील अन्याय, अज्ञान आणि भेदभाव दूर करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि स्त्री-मुक्तीचा ध्यास घेतला. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून काढण्याचे ऐतिहासिक कार्य महात्मा फुले यांनी केले आणि शिवजयंती उत्सव सुरू करून शिवरायांचा गौरव जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. आज उभारले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि महात्मा फुले–सावित्रीबाई फुले स्मारक हे केवळ पुतळे किंवा वास्तू नसून ते समाजाला प्रेरणा देणारी मूल्यांची केंद्रे आहेत असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य निर्माण केले. त्यांनी घडविलेला इतिहास, युद्धनीती अभ्यासाचा विषय आहे. तो तरुणांनी समजून घ्यावा. तसेच महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य अलौकिक आहे. या महापुरुषांची स्मारके प्रेरणा देणारी ठरतील, असे सांगत त्यांनी बोरी परिसरात लवकरच उपबाजार कार्यान्वित करण्यात येईल. तसेच सुलवाडे- जामफळ – कनोली उपसा सिंचन योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक बोरकुंड गावाच्या वैभवात भर घालेल. शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रेरणा देणारा आहे. त्याची माहिती शालेय अभ्यासक्रमांत देण्यात येईल. राज्यातील थोर पुरुषांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
आमदार भदाणे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्य चालविण्याचा आदर्श निर्माण केला. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, बाळासाहेब भदाणे, माजी आमदार कुणाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्रा. शरद पाटील, अनुप अग्रवाल, कुणाल पाटील,धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी,भाजप जिल्हाध्यक्ष बापुसाहेब खलाणे, माजी आमदार शरद पाटील, तुषार रेंधे,ज्योत्स्ना पाटील, साहेबराव खैरनार, गणेश गर्दे, किरण शिंदे, सतीश महाले, किरण पाटील, संजय शर्मा, संग्राम पाटील, अरविंद जाधव, विजय पाटील, रावसाहेब गिरासे, हिलाल माळी, अजय माळी, आशुतोष पाटील, शंकरराव खलाणे, भाऊसाहेब देसले, गुलाबराव कोतेकर, विनोद शेलार, राजेश बागुल आजी - माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.