लासलगाव, (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी - माझी वसुंधरा ५.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण व शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल १०,००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या गटात लासलगाव ग्रामपंचायतीने राज्य स्तरावर ५ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून ग्रामपंचायतीस ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये हरित आच्छादन वाढविणे, जलसंवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त अभियान, सौरऊर्जेचा वापर, स्वच्छता मोहिमा व जनजागृती यांसारख्या विविध घटकांवर गुणांकन करण्यात आले. या सर्व बाबींमध्ये लासलगाव ग्रामपंचायतीने सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध व परिणामकारक कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले.
ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संगोपन, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारणा, सौरऊर्जेवरील दिवे बसविणे, तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या उपक्रमांमुळे लासलगाव गाव शाश्वत विकासाच्या दिशेने आदर्श ठरत आहे.
बक्षीसाच्या रकमेतून प्रस्तावित विकासकामे
५० लाख रुपयांच्या बक्षीस रकमेचा विनियोग पर्यावरणपूरक व शाश्वत विकास प्रकल्पांसाठी करण्यात येणार असून त्यामध्ये पुढील कामांना प्राधान्य देण्यात येईल यामध्ये...
१) हरित आच्छादन वाढविणे – मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण, स्मृतीवन, सार्वजनिक उद्याने
२) विद्यमान हरित क्षेत्रांचे संवर्धन व देखभाल
३) रोपवाटिका निर्मिती
४) जलसंवर्धन व परकोलेशन प्रकल्प
५) रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम
६) नदी, तळे व नाल्यांचे पुनर्जीवन
७) नूतनीकरणयोग्य ऊर्जा वापरास प्रोत्साहन
८) सौरऊर्जेवरील / एलईडी दिव्यांची उभारणी
९) स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारणा
१०) पर्यावरण जनजागृती व स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण
प्रतिक्रिया
“१०,००० पेक्षा अधिक लोकसंख्या गटात लासलगाव ग्रामपंचायतीने राज्यात ५ वा व विभागात प्रथम क्रमांक मिळवून ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळवले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ग्रामस्थांचा सहभाग, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे नियोजनबद्ध प्रयत्न यामुळे हे यश शक्य झाले. भविष्यातही लासलगाव पर्यावरण संवर्धनात आदर्श ठरेल, असा विश्वास आहे. या पुरस्काराबद्दल ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील,उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी व नागरिकांचे अभिनंदन.
- छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य
पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. लासलगाव ग्रामपंचायतीने दाखविलेली एकजूट आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे हे यश मिळाले आहे. ५० लाख रुपयांच्या बक्षीस रकमेतून आणखी पर्यावरणपूरक व विकासाभिमुख प्रकल्प राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.
- समीर भुजबळ, माजी खासदार