चर्चेची 'हॅट्ट्रिक'... IAS अवि प्रसाद यांचा तिसरा विवाह... तिन्ही पत्नी आहेत 'आयएएस' अधिकारी

Share:
Main Image
Last updated: 16-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १६ फेब्रुवारी - मध्य प्रदेश केडरचे कार्यक्षम सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अवि प्रसाद सध्या आपल्या कामामुळे नव्हे, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. अवि प्रसाद यांनी नुकताच तिसरा विवाह केला असून, विशेष म्हणजे त्यांच्या तिन्ही पत्नी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध 'कुनो नॅशनल पार्क'मध्ये हा विवाह सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.

अंकिता धाकरे यांच्याशी बांधली लग्नगाठ
अवि प्रसाद यांनी २०१७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी अंकिता धाकरे यांच्याशी लग्न केले आहे. अंकिता धाकरे या सध्या मध्य प्रदेश राज्य मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. कुनो नॅशनल पार्क येथील एका हॉटेलमध्ये अतिशय खाजगी स्वरूपात हा सोहळा पार पडला. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

दोन्ही माजी पत्नी सध्या 'कलेक्टर'
अवि प्रसाद यांच्या वैयक्तिक आयुष्यातील हा योगायोग चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या आधीच्या दोन पत्नीदेखील आयएएस अधिकारी असून सध्या त्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत:
पहिली पत्नी: रिजु बाफना (२०१४ बॅच). त्या सध्या मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी  आहेत.
दुसरी पत्नी: मिशा सिंह (२०१६ बॅच). त्या सध्या रतलाम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अवि प्रसाद यांचा या दोन्ही अधिकाऱ्यांशी घटस्फोट झाला असून, आता त्यांनी अंकिता धाकरे यांच्यासोबत आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे.

कोण आहेत अवि प्रसाद?
अवि प्रसाद हे मूळचे उत्तर प्रदेशातील सीतापूरचे रहिवासी आहेत. त्यांचे आजोबा तांबेश्वर प्रसाद हे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. अवि प्रसाद यांनी २०१४ मध्ये यूपीएससी परीक्षेत देशात १३ वी रँक मिळवून यश संपादन केले होते. सध्या ते मध्य प्रदेश रोजगार हमी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. कटनीचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी राबवलेली कुपोषणमुक्तीची मोहीम खूप गाजली होती.

एकाच केडरमध्ये काम करताना तीन वेळा विवाहबंधनात अडकणे आणि तिन्ही वेळा जोडीदार आयएएस अधिकारी असणे, हा प्रशासकीय इतिहासातील एक दुर्मिळ योगायोग मानला जात आहे.

Comments

No comments yet.