मुंबई, (प्रतिनिधी) १६ फेब्रुवारी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चांदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठे विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. "आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आमची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आता विलीनीकरणाची चर्चा नको," असे स्पष्ट संकेत पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्यासमोर अडचणी उभ्या करण्याची आमची इच्छा नाही, गरज पडल्यास आम्ही त्यांच्या मदतीला धावून जाऊ, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यातच अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अजित पवार यांची शेवटची इच्छा पक्ष एक व्हावा अशी होती आणि त्याबाबत जयंत पाटील व अजित दादांमध्ये चर्चाही सुरू होती, असे दावे काही नेत्यांकडून केले जात होते. मात्र, जयंत पाटील यांनी आता या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अजित पवारच करणार होते नेतृत्व!
जयंत पाटील यांनी एका मासिकात दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. "दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याबाबत शरद पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाले होते," असे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर आता विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडल्याचे दिसत आहे.
सुनेत्रा पवारांना मदतीचे आश्वासन
"राजकारणात उद्या काय होईल हे सांगता येत नाही. अजित दादांच्या जाण्यानंतर नियतीचे खेळ स्पष्ट झाले आहेत," अशा शब्दांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "आम्ही सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्यासाठी कोणतेही प्रश्न निर्माण करणार नाही. शरद पवारांचे नेतृत्व स्वतंत्र आहे आणि पक्ष आपल्या स्वतंत्र अस्तित्वावर ठाम आहे. तरीही कौटुंबिक किंवा राजकीय अडचणीच्या काळात आम्ही सुनेत्रा वहिनींच्या मदतीला नक्की जाऊ," असे पाटील यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटाने आता स्वतंत्रपणे लढण्याचे आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे संकेत दिले आहेत. विलीनीकरणाच्या प्रस्तावावर शरद पवार गट आता ठामपणे नकार देत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.