इगतपुरीतील ४०० कोटींची ‘कथित’ लूट... पोलिसांच्या तपासावर न्यायालयाचे ताशेरे...

Share:
Last updated: 14-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १४ फेब्रुवारी - राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या कथित कंटेनर लूट प्रकरणात पोलिसांच्या तपासाला मोठा धक्का बसला आहे. पुराव्यांचा अभाव आणि विसंगत तक्रारीमुळे इगतपुरी न्यायालयाने विशेष तपास पथकाच्या (SIT) कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले असून, या गुन्ह्यातील सात संशयितांना जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे आता नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नेमके प्रकरण काय?
संदीप पाटील नावाच्या व्यक्तीने नाशिक ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबईहून नाशिकमार्गे दक्षिण भारतात ४०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन जाणारा एक कंटेनर लुटला गेला होता. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने असाही दावा केला होता की, संशयित विराट गांधी, जयेश कदम, सुनील धुमाळ, जनार्दन धायगुडे आणि विशाल नायडू यांच्यासह इतरांनी त्यांचे अपहरण करून, मारहाण केली आणि पिस्तूल दाखवून धमकावले.

न्यायालयाची निरीक्षणे आणि पोलिसांची कोंडी
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वाखाली 'एसआयटी' स्थापन केली होती. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना अनेक आघाड्यांवर अपयश आल्याचे न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट होते:

अस्तित्वाचा पुरावा नाही: कथित ४०० कोटी रुपयांच्या अस्तित्वाबाबत कोणताही ठोस पुरावा न्यायालयात सादर करता आला नाही.
कागदपत्रांची उणीव: एवढी मोठी रक्कम, कंटेनर किंवा व्यवहाराशी संबंधित कोणतेही दस्तऐवज पोलिसांना मिळवता आले नाहीत.
साक्षीदारांचा अभाव: घटनेची पुष्टी करतील असे स्वतंत्र साक्षीदार किंवा आर्थिक पुरावे मांडण्यात तपास यंत्रणा कमी पडली.

बचाव पक्षाचा युक्तिवाद
संशयितांच्या वतीने ज्येष्ठ वकील अविनाश भिडे, मृणाल भिडे आणि प्रसाद नागवंशी यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. "केवळ संशयावरून आणि पुराव्याविना ही कारवाई करण्यात आली आहे," हा त्यांचा दावा ग्राह्य धरत न्यायालयाने सातही संशयितांना जामीन मंजूर केला.

परराज्यातील पोलिसांची एन्ट्री
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत कर्नाटक पोलिसांनीही नाशिकमध्ये येऊन चौकशी केली होती. मात्र, आता न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर हे प्रकरण खरोखरच लुटीचे आहे की केवळ बनाव, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. जामीन मिळाल्यामुळे संशयितांना दिलासा मिळाला असला, तरी पुढील तपासात कोणते नवीन धागेदोरे हाती लागतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

४०० कोटींच्या नोटांच्या अस्तित्वाबाबत एकही कागदोपत्री पुरावा पोलिसांना शोधता आलेला नाही. त्यामुळे 'ती' अवाढव्य रक्कम हवेतच विरली की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.