राज ठाकरेंचा मोहन भागवतांवर घणाघाती हल्ला... बघा, अचानक काय घडलं?

Share:
Main Image
Last updated: 10-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १० फेब्रुवारी - सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेबद्दलच्या आग्रही भूमिकेला 'आजार' संबोधल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानाचा खरपूस समाचार घेत, सरसंघचालकांना आरसा दाखवला आहे. "मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच आमचे अंतिम सर्वोच्च प्राधान्य असून, ही अस्मिता आमचे स्वत्व आहे," अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भागवतांना सुनावले आहे.

भागवतांचे विधान आणि राज ठाकरेंचा पलटवार
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी 'भाषेबद्दल आग्रही राहणे आणि त्यासाठी आंदोलन करणे हा एक आजार आहे' असे विधान केले होते. यावर तीव्र आक्षेप नोंदवत राज ठाकरे म्हणाले की, "जर हा आजार असेल, तर तो संपूर्ण देशात पसरला आहे. कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, पश्चिम बंगाल आणि अगदी गुजरातमध्येही तीव्र भाषिक अस्मिता आहे. मग भागवतांनी तिथे जाऊन समरसतेचे धडे का दिले नाहीत?"

'उपस्थिती प्रेमापोटी नाही, तर भीतीपोटी'
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, "सरसंघचालकांच्या 'रटाळ' प्रवचनाला आलेली मंडळी प्रेमापोटी आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदींच्या सरकारी यंत्रणेच्या भीतीमुळे आली होती. या गैरसमजातून भागवतांनी आधी बाहेर यावे."

स्थानिक रोषाचे कारण 'आगाऊपणा'
राज्यात होणाऱ्या भाषिक संघर्षाचे मूळ स्पष्ट करताना ठाकरे म्हणाले की, जेव्हा इतर राज्यातील लोक मोठ्या संख्येने स्थलांतर करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारतात, भाषेचा अपमान करतात आणि स्वतःचे राजकीय मतदारसंघ तयार करतात, तेव्हा स्थानिकांमध्ये उद्रेक होतो. याला 'आजार' म्हणणे चुकीचे असून हा स्थानिकांच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघ आणि भाजपवर सडकून टीका
दुटप्पी भूमिका: "गुजरातमध्ये जेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना पळवून लावले, तेव्हा संघाने शांतता का राखली? तिथे का नाही कान उघडणी केली?" असा सवाल ठाकरेंनी विचारला.
राजकीय हस्तक्षेप: स्वतःला अराजकीय म्हणवून घेणाऱ्या संघाने भाजपच्या फायद्यासाठी भाषिक राजकारण करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. भय्याजी जोशी यांनी मुंबईच्या भाषेबाबत केलेल्या विधानाचा दाखला देत, त्यांनी संघाच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हिंदी लादणे: देशभरात हिंदी भाषा लादणाऱ्या सरकारला संघाने कधीही रोखले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हिंदुत्व आणि गोहत्येवरून खडा सवाल
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी संघप्रमुखांना घेरले. "हिंदूंवर संकट येईल तेव्हा आम्ही नक्कीच उभे राहू, जसे रझा अकादमी किंवा मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आम्ही भूमिका घेतली. पण हिंदुत्वाच्या नावाखाली उत्तर भारतात कावड यात्रांमध्ये जो बिभत्सपणा सुरू आहे, त्यावर भागवत का बोलत नाहीत? २०१४ मध्ये बीफ एक्सपोर्टमध्ये भारत ९ व्या क्रमांकावर होता, तो आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. गोहत्येच्या नावाखाली देशात जो राजकीय तमाशा आणि माथी भडकवण्याचे काम सुरू आहे, त्यावर संघ सरकारला खडे बोल का सुनावत नाही?" असा आक्रमक सवाल त्यांनी केला.

"या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता राहणारच. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाला येईल, तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील," अशा ठाम निर्धाराने राज ठाकरे यांनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.