उद्यापासून बारावीची परीक्षा... जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे कडक निर्देश...

Share:
Main Image
Last updated: 09-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ फेब्रुवारी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी ) परीक्षा 10 फेब्रुवारी  ते 18 मार्च 2026 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. या परीक्षांचे संचलन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे , अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी बैठकीत दिल्या.

जिल्ह्यात एकूण 27 परीरक्षक केंद्र (कस्टडी) असून इयत्ता 12 वी परीक्षेसाठी 129 परीक्षा केंद्र असून 81 हजार 973 विद्यार्थी तर इयत्ता 10 वी साठी 224 परीक्षा केंद्रावर 96 हजार 485 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत, अशा परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचारी अदलाबदल करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. जिल्हात परीक्षा सुरळीत, शांततेत व कॉपी विरहित पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी शिक्षण विभागासह महसूल व जिल्हा परिषदेशी संलग्न असलेल्या इतर सर्व विभागांकडून परीक्षा संनियंत्रणासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले जाणार आहेत.

जिल्ह्यातील संवेदनशील, अतिसंवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तसेच अशा केंद्राच्या बाहेर व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकही नियुक्त केले आहेत. तालुकास्तरावर भरारी पथके नियुक्त करण्याण्त आली असून विभागीय मंडळामार्फत 9 भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहेत. ही पथके जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राना भेटी देणार आहेत. तसेच दक्षता समितीची भरारी पथकही कोणतीही पूर्व सूचना न देता आकस्मिकपणे परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.ज्या परीक्षा केंद्रांवर यावर्षी सीसीटीव्ही नसेल, अशी परीक्षा केंद्र पुढील वर्षापासून बंद करण्यात येतील.

कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करताना आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तीस पोलीस प्रशासनाच्या हवाली करून त्याच्यावर Maharashtra preventation of Malpractises Act 1982 व भारतीय न्यास संहितेतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासने, निर्भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. कॉपी मुक्त परीक्षा अभियानात पालक,विद्यार्थी, संस्थाचालक, प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.