नाशिक, (प्रतिनिधी) ८ फेब्रुवारी - नाशिकच्या तेजस्विनी बाटवालने, बीसीसीआयच्या वरिष्ठ महिला एक दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्तर प्रदेश वरील विजयात जोरदार ८३ धावा करून लागोपाठ दुसरे अर्धशतक झळकवून विजयात मोठा वाटा उचलला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित वरिष्ठ महिला एक दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत राजकोट येथे ६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होत आहेत.
उत्तर प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करत ४९.१ षटकांत २७६ धावा केल्या. मुस्कान मलिकने सर्वाधिक १०० धावा केल्या. महाराष्ट्रातर्फे कर्णधार अनुजा पाटीलने ४ व मुक्ता मगरेने २ बळी घेतले. यष्टीरक्षक तेजस्विनी बाटवालने यष्टीमागे २ बळी टिपले. महाराष्ट्राने विजयासाठीच्या २७७ धावा सलामीच्या तेजस्विनी बाटवालच्या १० चौकरांसह ८३, कर्णधार अनुजा पाटीलच्या नाबाद ५३ व मुक्ता मगरेच्या ४८ धावांच्या जोरावर ४८.१ षटकांत ६ गडी राखून पार करत लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली. तेजस्विनीने पहिल्या गड्यासाठी ८४ व दुसऱ्या गड्यासाठी ८९ धावांच्या महत्वपूर्ण भागीदाऱ्या केल्या.
राजकोट येथे वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे बाकी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत - १० फेब्रुवारी -आसाम , १२ फेब्रुवारी - वडोदरा, १४ फेब्रुवारी - मध्य प्रदेश , १६ फेब्रुवारी - कर्नाटक व १८ फेब्रुवारी - ओडिशा .
तेजस्विनी बाटवालच्या या कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी, तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून उर्वरित स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.