नवी दिल्ली (प्रतिनिधी), दि. २४ जानेवारी २०२६ - देशातील रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता तंत्रज्ञानावर आधारित एक मोठे पाऊल उचलले आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘व्हेईकल-टू-व्हेईकल’ (V2V) संवाद प्रणाली विकसित करण्यात येत असून, त्यासाठी दूरसंचार विभागाने ३० गिगाहर्ट्झ रेडिओ फ्रिक्वेन्सीचे वाटप केले असल्याची महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
रस्ते सुरक्षेच्या गंभीर समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा, अजय टम्टा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अपघात रोखण्यासाठी ‘फोर-पिलर’ रणनीती
या बैठकीत रस्ते सुरक्षेच्या चार मुख्य स्तंभांवर (Four Pillars) आधारित सादरीकरण करण्यात आले:
१. अभियांत्रिकी : रस्त्यांची रचना आणि तांत्रिक सुधारणा.
२. अंमलबजावणी : वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी.
३. शिक्षण : रस्ते सुरक्षेबाबत जनजगृती.
४. आपत्कालीन सेवा : अपघातानंतर तातडीने उपचार मिळवून देणे.
कृत्रिम प्रज्ञा आणि आयआयटी कानपूरचे सहकार्य
रस्ते सुरक्षेला आधुनिक जोड देण्यासाठी आयआयटी कानपूरच्या सहकार्याने कृत्रिम प्रज्ञाधारित तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. यामुळे अपघातप्रवण क्षेत्रांचे अचूक विश्लेषण करणे सोपे होणार आहे. तसेच, केवळ 'ब्लॅक स्पॉट्स' (अपघातप्रवण ठिकाणे) नव्हे, तर 'लँडस्लाइड स्पॉट्स' (भूस्खलनप्रवण ठिकाणे) ओळखून त्यावर उपाययोजना करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.
खासदारांना महत्त्वाचे आवाहन
जिल्हा स्तरावर होणाऱ्या 'खासदार रस्ते सुरक्षा समिती'च्या बैठका अनियमित होत असल्याबद्दल सदस्यांनी चिंता व्यक्त केली. यावर गडकरी यांनी सर्व खासदारांना आवाहन केले की, त्यांनी आपापल्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहभागाने या बैठका नियमित घ्याव्यात, जेणेकरून स्थानिक पातळीवरील समस्या सुटू शकतील.
२२ भाषांत ‘रस्ते सुरक्षा गीत’
जनजागृतीसाठी मंत्रालयाने तयार केलेल्या रस्ते सुरक्षा गीताचे प्रदर्शनही यावेळी करण्यात आले. हे गीत २२ प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले असून, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी त्याचा प्रसार करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.
थोडक्यात महत्वाचे
* महामार्गालगत ‘ट्रॉमा केअर’ सुविधा वाढवणे.
* रस्ते अपघातग्रस्तांच्या नुकसानभरपाईत वाढ करणे.
* खराब दर्जाचे साईन बोर्ड आणि रिफ्लेक्टर बदलणे.
* राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण आणि योग्य देखभाल.