मुंबई, (प्रतिनिधी) १६ जानेवारी - "शिवसेना फोडून आणि चिन्ह चोरून कोणी स्वतःला मोठे समजत असेल, तर आजच्या निकालांनी त्यांचा भ्रमनिरास केला आहे. मुंबईकरांनी गद्दारांना नाकारून पुन्हा एकदा ठाकरेंच्या 'मशाली'वर विश्वास दाखवला आहे," अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीवर तोफ डागली. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निकालांवर भाष्य करताना त्यांनी भाजपच्या 'फोडा आणि राज्य करा' या नीतीचा समाचार घेतला.
घराणेशाही आणि गद्दारीचा पराभव सुषमा अंधारे म्हणाल्या की, "नेते सोडून गेले तरी सर्वसामान्य शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सदा सरवणकर यांची दोन्ही मुलं, रवींद्र वायकर यांची मुलगी आणि राहुल शेवाळे यांच्या भावजयी यांचा झालेला दारुण पराभव बरंच काही सांगून जातो. जे नेते ठाकरेंच्या जीवावर मोठे झाले, त्यांच्या जाण्याने पक्षाला काहीही फरक पडलेला नाही, हे आज सिद्ध झाले आहे. गद्दारी करणाऱ्यांच्या नातेवाईकांनाही जनतेने स्वीकारलेले नाही."
चिन्हापेक्षा 'ठाकरे' नाव महत्त्वाचे चिन्हाच्या वादावर बोलताना अंधारे यांनी स्पष्ट केले की, "आम्ही मशालीवर निवडणूक लढलो आणि मुंबईकरांनी ती स्वीकारली. याचाच अर्थ असा की, चिन्ह 'धनुष्यबाण' असो की 'मशाल', ते ठाकरेंकडून आले आहे का, हेच जनतेसाठी महत्त्वाचे ठरले. मुंबईकरांनी शिंदे गटाचा धनुष्यबाण नाकारून ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे."
भाजपच्या रणनीतीवर प्रहार "भाजपने शिंदेंना वेगळे करून 'फोडा आणि राज्य करा' ही जुनी नीती अवलंबली. जर शिंदे आणि ठाकरे आज एकत्र लढले असते, तर भाजपला पळता भुई थोडी झाली असती. एवढी फोडाफोडी करूनही भाजपला निर्विवाद यश मिळालेले नाही. काँग्रेस आणि इतर पक्षांना मिळालेल्या जागा भाजपच्या अपयशाची साक्ष देत आहेत," असेही अंधारे यांनी नमूद केले.
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये पवारांच्या भांडणाचा लाभ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निकालांवर बोलताना त्या म्हणाल्या, "भाजपने जे शिंदेंबाबत केले, तेच पुण्यात अजित पवारांसोबत केले. दोन पवारांच्या भांडणात भाजपने आपला फायदा करून घेतला. एकनाथ शिंदे आणि अजित दादांना ज्या दिवशी हे कटू सत्य उमजेल, तोच राज्यासाठी सुदिन ठरेल."
या निकालांनी ठाकरेंची शिवसेना संपलेली नाही, तर ती अधिक जोमाने उभी राहिली आहे, असा विश्वासही सुषमा अंधारे यांनी यावेळी व्यक्त केला.