तरुणांनो तयार रहा... मुंबई महापालिकेत इतक्या पदांसाठी महाभरती

Share:
Main Image
Last updated: 05-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ५ मार्च - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ७० हजार पदांची महाभरती करण्याची घोषणा केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिकेत तब्बल ५६,१२६ पदे रिक्त असल्याची कबुली प्रशासनाने दिली असून, ही पदे तातडीने भरण्याची मागणी कामगार संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

रिक्त पदांचा लेखाजोखा
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पालिकेच्या विविध विभागांत मंजूर पदांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
एकूण मंजूर पदे: १,४५,२५६
सध्या कार्यरत कर्मचारी: ८९,१३०
एकूण रिक्त पदे: ५६,१२६
प्रगतीपथावरील भरती: ९,२९५ पदे (यापैकी ५,४८६ पदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे).

Advertisement

आयुक्तांकडे भरतीची मागणी
राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या पदभरतीच्या आश्वासनानंतर, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे. पालिकेवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि रिक्त जागांमुळे खोळंबलेली कामे मार्गी लावण्यासाठी ही भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

प्रशासनाचा 'कात्री' लावण्याचा विचार?
एकीकडे भरतीची मागणी होत असताना, दुसरीकडे पालिका प्रशासन महसुली खर्च कमी करण्यासाठी पदे कमी करण्याच्या  तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

डिजिटलायझेशनचा प्रभाव: संगणकीय युगामुळे कामाच्या पद्धती बदलल्या असून, जुन्या धाटणीची अनेक पदे आता कालबाह्य ठरत आहेत.
आस्थापना फेरआढावा: आतापर्यंत २७ खात्यांचा आढावा घेण्यात आला असून, अनावश्यक पदे रद्द करणे किंवा भत्ते बंद करण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे.

Comments

No comments yet.