मालेगाव, (प्रतिनिधी) १६ जानेवारी - राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील 'इस्लाम' पक्षाने (Indian Secular Largest Assembly of Maharashtra) ३५ जागा जिंकून मालेगावच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. दुसरीकडे, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) दारूण पराभवाचा सामना करावा लागला असून, त्यांच्या २६ पैकी २४ उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे.
इस्लाम पक्षाचे 'सेक्युलर' वर्चस्व माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पक्षाने निवडणुकीपूर्वीच मोठी मोर्चेबांधणी केली होती. ८४ जागांच्या महापालिकेत ३५ जागा जिंकून हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आसिफ शेख यांच्या मातोश्री आणि माजी महापौर ताहेरा शेख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही विजय मिळवला आहे. समाजवादी पक्षानेही ५ जागा मिळवून इस्लाम पक्षाला साथ दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी मालेगावमध्ये यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शिंदे गटाने २४ पैकी १८ जागांवर विजय मिळवून शहरात आपली ताकद सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोडून शिंदे गटात सामील झालेल्या दिनेश ठाकरे यांनी भाजपचे महानगरप्रमुख देवा पाटील यांचा पराभव करत मोठी खळबळ उडवून दिली.
एमआयएम: मागील निवडणुकीत मोठी ताकद असलेल्या एमआयएमला यंदा केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले. मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाची पिछेहाट झाल्याचे दिसत आहे.
भाजप: जळगाव आणि नाशिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या भाजपचा मालेगावात मात्र 'सुपडा साफ' झाला आहे. केवळ २ जागांवर भाजपला यश मिळाले असून, अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे.
राजकीय समीकरणे आणि सत्तास्थापना मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ४३ जागांची आवश्यकता आहे. इस्लाम पक्षाकडे ३५ जागा असून, त्यांना सत्ता स्थापनेसाठी केवळ ८ जागांची गरज आहे. समाजवादी पक्ष (५ जागा) आणि काँग्रेस (३ जागा) यांच्या पाठिंब्यावर आसिफ शेख पुन्हा एकदा मालेगावच्या सत्तेच्या चाब्या आपल्या हातात घेण्याची दाट शक्यता आहे.