शिर्डी, (प्रतिनिधी) १६ जानेवारी - प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत महसूल व पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. संबंधित व्यक्ती किंवा कार्यकर्ता कोणाचाही असो, त्याला पाठीशी न घालता कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
लोणी येथे गुरुवारी आयोजित 'जनता दरबारा'त मंत्री डॉ. विखे पाटील यांनी राज्यभरातून व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सामाजिक व व्यक्तिगत स्वरूपातील निवेदने स्वीकारून संबंधित प्रश्नांचा निपटारा करण्याच्या, तसेच निर्धारित वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
सध्या प्रवरा नदीपात्रातून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जनता दरबारात प्राप्त झाल्या. याची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी महसूल व पोलीस प्रशासनाची तातडीने बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी कोणताही निष्काळजीपणा न करता कडक धोरण अवलंबवावे. ज्या भागातून वाळू उपसा होत असेल, त्याची जबाबदारी संबंधित गावातील तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर निश्चित करून वेळप्रसंगी त्यांच्यावरही कारवाई करावी. तसेच प्रशासनाच्या नावाखाली अशा बेकायदेशीर कृत्याला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींची गय करू नका, असे निर्देशही डॉ. विखे पाटील यांनी दिले.
शासकीय योजना व घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून देताना कागदपत्रांची सखोल पडताळणी करूनच निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले. या बैठकीला संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी येथील प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार व मंडल अधिकारी उपस्थित होते.
आचारसंहिता शिथिल झाल्याने शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. प्रलंबित विकासात्मक कामांना प्राधान्य देऊन ती तातडीने मार्गी लावावीत, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.