नाशिक, (प्रतिनिधी) १५ जानेवारी - प्रसूतीदरम्यान तसेच प्रसूतीनंतर माता व नवजात बाळांना सुरक्षित, सन्मानजनक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ‘लक्ष्य’ (LaQshya – Labour Room Quality Improvement Initiative) कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्हा रुग्णालयाला राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातून हे मानांकन मिळवणारी नाशिक जिल्हा रुग्णालय ही एकमेव सार्वजनिक आरोग्य संस्था ठरली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सार्वजनिक रुग्णालयांमधील प्रसूती कक्ष व माता-नवजात शिशु काळजी कक्षांची गुणवत्ता सुधारून माता व बालमृत्यू दरात घट करणे हा ‘लक्ष्य’ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ, स्वच्छता, संसर्ग प्रतिबंध, वेळेवर उपचार व रुग्णांशी सन्मानजनक वागणूक या सर्व निकषांवर नाशिक जिल्हा रुग्णालयाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
मागील वर्षी जिल्हा रुग्णालयाने राज्यस्तरावर ‘लक्ष्य’ कार्यक्रमात अव्वल स्थान पटकावले होते. यंदा केंद्रीय निरीक्षकांच्या पथकाने तब्बल १२ हजार प्रश्नांवर आधारित तपासणी करत प्रसूती कक्ष, मातृत्व ऑपरेशन थिएटर, कर्मचारी कौशल्य, प्रशिक्षण, उपकरणे, संरचना व प्रक्रिया सुधारणा यांचे मूल्यमापन केले. या तपासणीत रुग्णालयाने ८९ टक्के गुण मिळवत राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळवले असून हे मानांकन पुढील तीन वर्षांसाठी वैध असणार आहे.
या यशामुळे नाशिक जिल्ह्यातील गर्भवती महिला व नवजात बाळांना जिल्हा रुग्णालयात अधिक सुरक्षित, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळत असल्याचे अधोरेखित झाले आहे. तसेच रुग्णालयाची प्रतिमा राज्य व राष्ट्रीय पातळीवर अधिक बळकट झाली आहे.
प्रसूती कक्षाचे सुसज्जीकरण, कर्मचारी प्रशिक्षण, गुणवत्ता तपासणी व सेवा सुधारणा यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. या उल्लेखनीय यशासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निलेश पाटील, डॉ. बाळू पाटील, डॉ. संदीप सूर्यवंशी, लक्ष्य नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. रोहन बोरसे, मेट्रन अनिता भालेराव, परिचारिका व इतर कर्मचारी, हॉस्पिटल मॅनेजर डॉ. दीपाली भामरे, नर्सिंग कॉलेजचे सतीश वाघमारे व अभिषेक गोसावी यांचे विशेष योगदान लाभले.
मानांकनासाठी निरिक्षणातील ठळक मुद्दे व निरीक्षणाअंती गुणात्मक टक्केवारी
कार्यक्षम वैद्यकीय सेवा 99.44 टक्के, रूग्णालयांनी रूग्णांचे हक्क पाळणे 100 टक्के, मनुष्यबळ, उपकरणे आणि साधने 87.93 टक्के, सहाय्य सेवासुविधा 92.86 टक्के, रूग्णालयातील आरोग्यसेवा 89.29 टक्के, संसर्ग प्रतिबंधक धोरणे 88.89 टक्के, गुणवत्ता व्यवस्थापन 80.36 टक्के व रूग्णालयातील उपचारांचे परिणाम 87.5 टक्के.
रूग्णालयातील प्रसूती माहे 2025-26 (डिसेंबर 2025अखेर)
एकूण प्रसूतीसाठी दाखल झालेल्या माता-8531
नैसर्गिक प्रसूती झालेल्या माता-1412
सिझेरियन प्रसूती-2884
एकूण प्रसूती-5948
सेरोपॉझिटीव्ह बाधित प्रसूती-42
कावीळ ब बाधित माता-74
सिफिलिस बाधित माता-21
‘नाशिक जिल्हा रूग्णालयाच्या, टिमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि उत्कृष्ट सेवेमुळे लक्ष्य (LaQshya) अंतर्गत राष्ट्रीय मानांकन मिळाले, यावर्षी हे राज्यातील एकमेव सार्वजनिक आरोग्य संस्था म्हणून मिळालेले मानांकन गर्भवती महिला व नवजात बाळांसाठी सुरक्षित, दर्जेदार आणि सन्मानजनक आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे एक मोठे यश आहे.’
(डॉ.चारूदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक)