अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १५ जानेवारी - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक ३ मध्ये बनावट ओळखपत्रांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील आनंद विद्यालय मतदान केंद्र परिसरात बनावट आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्रे बाळगणाऱ्या काही संशयितांना प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. या गंभीर प्रकरणाची आता पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
आज मतदान प्रक्रिया सुरू असताना प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय मतदान केंद्राच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. काही व्यक्तींकडे बनावट आधार कार्ड आणि बनावट मतदान ओळखपत्रे असल्याची तक्रार निवडणूक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करत संबंधित संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
पोलिसांकडून कसून चौकशी
या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले की, "बनावट ओळखपत्रांबाबत तक्रारी प्राप्त होताच संशयित इसमांना तातडीने ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. बनावट ओळखपत्रे कोठून आली आणि त्यामागे कोणाचे सूत्रधार आहेत, याचा शोध घेतला जात आहे."
पारदर्शक निवडणुकीसाठी प्रशासन कटिबद्ध
चौकशीमध्ये जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. "निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही," असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.
या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या पोलीस तपासाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.