महामार्गांपासून विमानतळांपर्यंत... गुप्तचरची मोठी कारवाई... मोठे घबाड हाती...

Share:
Main Image
Last updated: 15-Jan-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १५ जानेवारी - अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डी.आर.आय.) मुंबई विभागीय युनिटने गेल्या तीन दिवसांत अनेक महत्त्वपूर्ण कारवाई केल्या. या मोहिमेत 522.138 किलो गांजा, 1.12 किलो कोकेन, 3.15 किलो हायड्रोपोनिक वीड आणि 280 ग्रॅम ॲम्फेटामाइन जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या मालाची अवैध बाजारात एकूण किंमत सुमारे 17.55 कोटी रुपये आहे. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग-47 वर नागपूरजवळच्या भागीमरी टोल नाक्यावर एका ट्रकला अडवले. सखोल तपासणी केली असता, कुलर, टेबल फॅन आणि ब्लँकेटच्या या मालाखाली लपवलेले 522.138 किलो वजनाचे गांजाचे 100 पॅकेट असलेले 17 ‌‌खोके सापडले. या मालाची किंमत सुमारे 2.6 कोटी रुपये आहे. हा माल अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे घटक कायदा 1985 अंतर्गत जप्त करण्यात आला. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली.

रात्रभर चाललेल्या एका गुप्त कारवाईत, डीडीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या आवारातून बाहेर पडणाऱ्या एका विमानतळ केटरिंग कंपनीच्या फूड ट्रकला अडवले. तपासणीत चालकाने प्रवासी सीटच्या मागे 3.15 किलो हायड्रोपोनिक वीड लपवून ठेवल्याचे आढळले. त्यानंतर केलेल्या पाठपुराव्याच्या कारवाईत आणखी चार जणांना अटक करण्यात आली. सुमारे 3.15 कोटी रुपये किंमतीचे हायड्रोपोनिक वीड तसेच संबंधित वाहन अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे घटक कायदा 1985 अंतर्गत जप्त करण्यात आले. विमानतळाच्या परिसरात कार्यरत असलेल्या तस्करी टोळीच्या पाच सदस्यांनाही अटक करण्यात आली.

आणखी एका कारवाईत, डीडीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर एन्टेबी (युगांडा) येथून आलेल्या एका केनियन नागरिकाला अडवले. तिच्या पोटात 446 ग्रॅम कोकेन असलेल्या 7 कॅप्सूल आढळल्या. ज्यांची किंमत 4.66 कोटी रुपये आहे. हे कोकेन एनडीपीएस कायद्यांतर्गत जप्त करण्यात आले. त्या प्रवाशाला अटक करण्यात आली. एका वेगळ्या प्रकरणात, दिल्लीहून देशांतर्गत विमानाने मुंबईत आलेल्या एका नायजेरियन नागरिकाला अडवण्यात आले. तिच्या सामानाची सखोल तपासणी केली असता, 673 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 6.73 कोटी रुपये आहे. हा प्रतिबंधित पदार्थ एनडीपीएस कायद्यांतर्गत जप्त करून प्रवाशाला अटक करण्यात आली.

आणखी एका कारवाईत, दिल्लीहून देशांतर्गत विमानाने गोव्यात आलेल्या एका नायजेरियन नागरिकाला अडवण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून 280 ग्रॅम ॲम्फेटामाइन जप्त केले, ज्याची किंमत 22 लाख रुपये आहे. हे पदार्थ एनडीपीएस कायद्यांतर्गत जप्त करण्यात आले आणि प्रवाशालाही अटक करण्यात आली.

महसूल गुप्तचर संचालनालय आपल्या 'नशा मुक्त भारत अभियाना'प्रती वचनबद्धतेवर ठाम आहे तसेच अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी, संघटित तस्करी टोळ्यांचा नायनाट करण्यासाठी आणि देशाचे सार्वजनिक आरोग्य, कल्याण आणि सुरक्षा जपण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.

Comments

No comments yet.