अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १५ जानेवारी - तुम्ही ज्या सोसायटीत राहता, त्या इमारतीची जागा नक्की कोणाच्या नावावर आहे? अजूनही बिल्डरच्याच? असे असेल तर भविष्यात अडचणी येऊ शकतात. म्हणूनच, बिल्डरने टाळाटाळ केली तरी आता सोसायट्यांना आपल्या हक्काची जागा स्वतःच्या नावावर करून घेता येणार आहे. यासाठी सहकार विभागाने जिल्ह्यात 'मानीव अभिहस्तांतरण' मोहीम हाती घेतली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.
कायद्यानुसार इमारत पूर्ण झाल्यावर बिल्डरने ती जागा सोसायटीच्या नावावर करून देणे बंधनकारक असते. पण अनेकदा बिल्डर तसे करत नाहीत. जागा सोसायटीच्या नावावर नसेल, तर भविष्यात इमारतीचा पुनर्विकास करताना किंवा वाढीव एफएसआय मिळवताना सोसायट्यांची अडवणूक होते.
यावर तोडगा म्हणून शासनाने 'मानीव अभिहस्तांतरण' प्रक्रिया सुलभ केली आहे. जर बिल्डर जागा नावावर करून देत नसेल, तर सोसायटीने आपल्या सभेत त्याबाबतचा ठराव मंजूर करावा. हा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केल्यास, शासन स्वतः पुढाकार घेऊन जागा सोसायटीच्या नावावर करून देईल.
यासाठी सोसायट्यांनी आपले लेखापरीक्षक किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.