मतदान यंत्रासोबत लागणार 'पाडू' यंत्र... काय आहे ते? मुंबईतच का लावले जाणार? घ्या जाणून सविस्तर...

Share:
Main Image
Last updated: 14-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ जानेवारी - आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी वेगाने सुरू असतानाच, ईव्हीएम (EVM) ला जोडण्यात येणाऱ्या 'पाडू' (PADU - Printing Auxiliary Display Unit) या नव्या यंत्रामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि रोहित पवार यांसारख्या प्रमुख नेत्यांनी या यंत्राच्या वापरावर शंका उपस्थित केल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने यावर सविस्तर स्पष्टीकरण देऊन हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे हे 'पाडू' (PADU) यंत्र?

'पाडू' म्हणजे 'प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट'. हे यंत्र केवळ मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रायोगिक तत्त्वावर वापरले जाणार आहे. मुंबईत 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड' (BEL) कडील 'M3A' या अत्याधुनिक प्रकारच्या ईव्हीएम मशिन्स वापरल्या जाणार आहेत. या यंत्रांना बॅकअप म्हणून 'पाडू' जोडले जाणार आहे.

हे यंत्र नेमके काय काम करणार?

ज्याप्रमाणे VVPAT यंत्रात मतदानाची छापील चिठ्ठी दिसते, त्याच धर्तीवर 'पाडू' हे अतिरिक्त 'स्टोअरेज' म्हणून काम करेल.

मतदानाची नोंद कंट्रोल युनिटसोबतच या यंत्रातही साठवली जाईल.

 मतमोजणीच्या वेळी जर कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला किंवा काही तांत्रिक बिघाड झाला, तर 'पाडू' यंत्रात साठवलेला डाटा वापरता येईल.

विशेष परिस्थितीत या यंत्रातील डाटाची प्रिंट काढून मतमोजणी पूर्ण करणे शक्य होणार आहे.

फक्त मुंबईसाठीच का?
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईत वापरली जाणारी मशिन्स ही 'M3A' श्रेणीतील आहेत. ही यंत्रे केवळ मुंबईपुरती मर्यादित असल्याने 'पाडू'चा वापरही इतर शहरांत न होता फक्त मुंबईतच होणार आहे. मुंबईतील सुमारे १४० केंद्रांवर अत्यंत अपवादात्मक परिस्थितीसाठी ही यंत्रे सज्ज ठेवली जातील.

राजकीय विरोध आणि आयोगाची भूमिका
ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षांनी 'पाडू' यंत्राच्या एन्ट्रीवर संशय व्यक्त केला होता. मात्र, "हे यंत्र केवळ तांत्रिक बिघाड झाल्यास मतमोजणीत अडथळा येऊ नये म्हणून वापरले जाणारे 'बॅकअप' साधन आहे," असे आयोगाने स्पष्ट केले आहे. नियमित मतमोजणी ही नेहमीप्रमाणे कंट्रोल युनिटद्वारेच केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

Comments

No comments yet.