नाशिक, (प्रतिनिधी) १४ जानेवारी - पार्ट टाईम जॉब मिळवून देण्याच्या बहाण्याने शहरातील चार जणांना सायबर भामट्यांनी तब्बल ३६ लाख रूपयांना चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यात एका महिलेचा समावेश असून टास्क आणि वेगवेगळी कारणे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील महिला गेल्या नोव्हेंबर महिन्यात इंटरनेटवर पार्ट टाईम जॉबचा शोध घेत असतांना तिच्याशी सायबर भामट्यांनी संपर्क साधला होता. टेलीग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत भामट्यांनी महिलेचा व्हॉटसअप नंबर मिळविला. त्यानंतर वेगवेगळ्या व्हॉटसग्रुपच्या माध्यमातून महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. याच प्रकार शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन जणांनाही भामट्यांनी फसविले असून, टास्क देवून आणि विविध कारणे सांगून भामट्यांनी घरगुती कामाचा शोध घेणाºयांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले आहे. या प्रकरणात चौघांची ३६ लाख ८८२ रूपयांची फसवणूक करण्यात आली असून, भामट्यांशी संपर्क तुटल्याने तक्रारदारांनी पोलिसात धाव घेतली आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करीत आहेत.