मनोहर शिंदे, (नाशिक) २१ जुलै - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या आणि साधू-महंतांच्या स्नानासाठी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त असणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या गोदावरीत दूषित पाणी येत असून या गंभीर मुद्द्यावर प्रशासनासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. पुढील बैठकीपर्यंत हे चित्र बदलेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, परिस्थिती अशीच राहिल्यास गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आखाडा परिषद स्वतः मैदानात उतरेल आणि जनतेला सोबत घेऊन स्वच्छता मोहीम राबवेल, असा सूचक इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजयदास महाराज यांनी दिला.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अखिल भारतीय पंच निर्मोही आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत राजेंद्रदास महाराज यांच्यासह प्रमुख साधू-महंत उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि आखाडा परिषदेची भूमिका:
गोदा प्रदूषण अन् कामे:
तपोवन परिसर आणि गोदाकाठाची पाहणी करण्यात आली असून चाललेल्या कामांबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, काही ठिकाणी कामाचा वेग मंदावला आहे. मार्च महिन्यापर्यंत शासनाने सर्व कामे पूर्ण करून साधुग्रामचा ताबा आखाड्यांकडे द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या भूमीसंपादनाचा प्रश्न:
साधूग्रामसाठी जागा देण्यास काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र, प्रशासनाकडून योग्य मोबदला दिला जात असून चर्चेद्वारे हा प्रश्न लवकरच सुटups, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बोधचिन्हात 'धनुष्य-बाणाचा' समावेश करा:
कुंभमेळ्याच्या बोधचिन्हात (Logo) शिवचिन्हांना स्थान दिल्याबद्दल दुमत नाही, कारण शिव हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत. मात्र, त्यासोबतच प्रभू श्रीरामाचे 'धनुष्य आणि बाण' यांनाही बोधचिन्हात स्थान दिले जावे, अशी प्रमुख मागणी आखाडा परिषदेने केली.
पंतप्रधानांना ध्वजारोहणाचे आमंत्रण:
कुंभमेळ्याच्या भव्य ध्वजारोहण सोहळ्यासाठी राज्याचे व देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कावनई येथे पर्व स्नान:
कावनई येथील कपिलधारा तीर्थक्षेत्री अमृत स्नानाऐवजी 'पर्व स्नाना'साठी आखाड्यांनी तिथी निश्चित केली असून, सर्व आखाडे त्या दिवशी स्नानासाठी जातील.
राम मंदिर दान चोरी प्रकरणी SIT चौकशीची मागणी
अयोध्या येथील श्रीराम मंदिर दान चोरी प्रकरणावर बोलताना संजयदास महाराज म्हणाले की, "या प्रकरणात कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी विश्वासघात केला आहे. वरिष्ठ विश्वस्त चंपतराय यांचे नाव समोर आले असले तरी तेथील लोकांनी त्यांचा विश्वासघात केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी."