आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा सुवर्ण डंका... मिळवली एवढी घसघशीत सुवर्णपदके...

Share:
Main Image
Last updated: 20-Jul-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २० जुलै - आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या गुणवान विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. जुलै २०२६ मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. उझबेकिस्तान येथे झालेल्या ५८ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये (IChO २०२६) भारताच्या चारही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावत देशाला जगात अव्वल स्थान मिळवून दिले. तर लिथुआनिया येथे झालेल्या ३७ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये (IBO २०२६) भारतीय संघाने १ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांवर आपले नाव कोरले.

रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये रचला इतिहास!

ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे १० ते १९ जुलै २०२६ दरम्यान रंगलेल्या ५८ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या चारही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकण्याचा अभूतपूर्व पराक्रम केला. या ऐतिहासिक कामगिरीसह पदक तालिकेत भारत देश चीन, व्हिएतनाम आणि रशियासोबत संयुक्तपणे जगात पहिल्या स्थानावर राहिला. या वर्षी ९३ देशांतील ३६३ विद्यार्थी या महाकुंभात सहभागी झाले होते.

भारताचे ‘सुवर्ण’ मानकरी:

देबदत्त प्रियदर्शी – भुवनेश्वर, ओडिशा (सुवर्णपदक)

हर्षित सिंगला – मंडी गोबिंदगड, पंजाब (सुवर्णपदक)

कबीर चिल्लर – दिल्ली (सुवर्णपदक)

संदीप कुची – हैदराबाद, तेलंगणा (सुवर्णपदक)

कठिण परीक्षेचा सामना:

स्पर्धेतील प्रायोगिक आणि सैद्धांतिक परीक्षा अत्यंत आव्हानात्मक होत्या. यात वनस्पतींच्या अर्कांपासून निळ्या द्रावणाची रचना ओळखणे, युरेनियमच्या वस्तुमानाचा अंदाज लावणे, कार्बनची नवीन रूपे आणि सूक्ष्मस्तरीय जैवरासायनिक चाचण्या यांसारख्या अत्यंत क्लिष्ट ९ सैद्धांतिक आणि ३ प्रायोगिक प्रश्नांचा समावेश होता. प्रा. सुभजित बंडोपाध्याय आणि डॉ. इंद्राणी सेन यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून संघाचे नेतृत्व केले.

 जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये १ सुवर्ण, ३ रौप्य पदके

विल्नियस (लिथुआनिया) येथे १२ ते १९ जुलै २०२६ दरम्यान पार पडलेल्या ३७ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारतीय विद्यार्थ्यांनी आपला दबदबा कायम राखला. यात सहभागी झालेल्या सर्व ४ विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली. या स्पर्धेत ७८ देशांतील ३०७ विद्यार्थी उतरले होते. प्रा. रेखा वर्तक आणि डॉ. अनुपमा रोनाड यांनी भारतीय संघाला मार्गदर्शन केले.

Advertisement

पदक विजेते बाहुबली:

भव्या गुणवाल – महेंद्रगड, हरियाणा (सुवर्णपदक)

सौमिल मैती – हावडा, पश्चिम बंगाल (रौप्यपदक)

निशित कलानी – पाली, राजस्थान (रौप्यपदक)

अनमोल कुमार – मानसा, पंजाब (रौप्यपदक)

६ तासांची खडतर प्रात्यक्षिके:

विल्नियस विद्यापीठाच्या लाइफ सायन्सेस सेंटरने घेतलेली ही परीक्षा उच्च दर्जाची होती. ६ तासांच्या या प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांनी मॉलिक्युलर बायोलॉजी, ॲनिमल फिजिओलॉजी (ॲस्पिरिनच्या फार्माकोकायनेटिक्सचे मूल्यांकन), कीटकांच्या तोंडाच्या भागांचे अचूक विच्छेदन आणि डिजिटल विश्लेषणासाठी 'ImageJ' सॉफ्टवेअरचा वापर करत प्लांट कॉम्प्युटेशनल बायोलॉजीचे कठीण प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण केले.

होणार कौतुकाचा वर्षाव; आज अनौपचारिक संवाद

भारतीय विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (HBCSE), राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड संचालन समिती आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग (DAE), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) व शिक्षण मंत्रालयाने (MoE) विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे आभार मानले आहेत.

आकडेवारीच्या नजरेतून भारताची कामगिरी 

IChO (रसायनशास्त्र): भारताचा हा २७ वा सहभाग होता. आजवरच्या इतिहासात भारताच्या ३२% विद्यार्थ्यांनी सुवर्ण तर ५१% विद्यार्थ्यांनी रौप्य पदके मिळवली आहेत.

IBO (जीवशास्त्र): भारताचा हा २६ वा सहभाग होता. एकूण १०४ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत १७ जणांनी सुवर्ण, ६९ जणांनी रौप्य आणि १७ जणांनी कांस्यपदक पटकावले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.