नाशिकमध्ये अपघातांची मालिका सुरूच... पादचाऱ्यासह दुचाकीस्वाराचा मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 16-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १६ जुलै - नाशिक शहर आणि परिसरात रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांमध्ये दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये महामार्ग ओलांडणाऱ्या एका परप्रांतीय पादचाऱ्याचा आणि औद्योगिक वसाहतीतील एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव आणि सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक; उत्तर प्रदेशच्या तरुणाचा मृत्यू

पहिली दुर्दैवी घटना मुंबई-आग्रा महामार्गावर घडली. युनूस सलीम खान (वय ३८, रा. हरडौली, जि. बांदा, उत्तर प्रदेश) हा तरुण रविवारी (दि. १२) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास महामार्ग ओलांडत होता. महामार्ग ओलांडून तो एच.पी. पेट्रोल पंपाच्या दिशेने जात असताना, ओझरकडून द्वारकाच्या दिशेने अतिवेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत युनूस गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा मित्र इसरार मुमताज खान (रा. खडकाळी, भद्रकाली) याने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. हवालदार आहेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

सातपूर औद्योगिक वसाहतीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक; २७ वर्षीय तरुण ठार

दुसरा अपघात सातपूर औद्योगिक वसाहतीतील स्वरूप कंपनीसमोर सोमवारी (दि. १३) दुपारी घडला. अफ्फान हदिसुल्लाह चौधरी (वय २७, रा. दत्त मंदिराजवळ, अंबड लिंक रोड, सातपूर) हा तरुण आपल्या मोपेड दुचाकीवरून कार्बन नाक्याकडून महिंद्रा कंपनीच्या दिशेने जात होता. याच दरम्यान स्वरूप कंपनीसमोर त्याच्या दुचाकीची दुसऱ्या एका दुचाकीशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अफ्फानच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा भाऊ फैसल चौधरी याने दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, हवालदार बाळासाहेब सूर्यवंशी तपास करत आहेत.

वाढत्या अपघातांमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक शहर आणि परिसरात वाढत्या वाहनसंख्येसोबतच बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. महामार्गावर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित क्रॉसिंग नसणे आणि औद्योगिक वसाहतींमधील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांचा अनिर्बंध वेग यामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.