मंत्री अदिती तटकरे अचानक सखी वन स्टॉप सेंटरची पाहणी करण्यासाठी येतात तेव्हा...

Share:
Main Image
Last updated: 14-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ जुलै - राज्यातील महिलांच्या सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या शासकीय यंत्रणा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पावले उचलली आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मुंबईतील विविध संस्था व केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यादरम्यान महिला व बालविकास आयुक्त जगदीश मिनियार, विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केईएम रुग्णालयातील केंद्रात सुधारणांचे आदेश

मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वप्रथम परळ येथील केईएम (KEM) रुग्णालयातील ‘सखी वन स्टॉप सेंटर’ला भेट दिली. हिंसाग्रस्त आणि संकटग्रस्त महिलांना तातडीने, सन्मानपूर्वक व दर्जेदार सेवा मिळाव्यात, यासाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्रातील भौतिक सुविधांची पाहणी केल्यानंतर, तेथील आवश्यक त्या सर्व सुधारणा व दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कामा रुग्णालयातील केंद्र १ ऑगस्टपासून होणार सुरू

त्यानंतर त्यांनी कामा व अल्बलेस रुग्णालयातील नव्याने उभारण्यात आलेल्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’ची पाहणी केली. या केंद्राचे बांधकाम आणि प्राथमिक व्यवस्था पूर्ण झाली असून, १ ऑगस्ट २०२६ पर्यंत हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.

रिक्त पदे १ ऑगस्टपूर्वी भरणार

Advertisement

केंद्राच्या कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तेथील रिक्त पदे तातडीने भरून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. प्रशासनाने यावर उत्तर देताना १ ऑगस्टपूर्वी सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही दिली.

नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहाची पाहणी

दौऱ्याच्या पुढील टप्प्यात मंत्री तटकरे यांनी कुलाबा येथील 'महिला विकास मंडळ' संचलित नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहाला (Working Women's Hostel) भेट दिली. तेथील सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, निवास व्यवस्था आणि इतर सुविधांची त्यांनी बारकाईने पाहणी केली. वसतिगृहातील एकूण व्यवस्था समाधानकारक असल्याचे नमूद करत, रहिवासी महिलांना अधिक दर्जेदार व सुरक्षित पर्यावरण उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

शासन कटिबद्ध: मंत्री आदिती तटकरे

"महिलांच्या सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. ‘सखी वन स्टॉप सेंटर’ तसेच कार्यरत महिलांच्या वसतिगृहांमार्फत महिलांना अधिक प्रभावी, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर शासनाचा भर राहील," असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.