नाशिक रिंगरोडसाठी माडसांगवीत बैठक... बाधित शेतकऱ्यांना मिळणार एवढी रक्कम...

Share:
Main Image
Last updated: 11-Jul-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ११ जुलै - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी प्रस्तावित असलेल्या नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड) प्रकल्पाची अंमलबजावणी करताना विकास आणि शेतकरी हित यांचा सुवर्णमध्य साधला जाईल. या प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून भूसंपादन प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. तसेच, थेट खरेदी प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना नियमानुसार दोनपट मोबदल्यासह २५ टक्के अतिरिक्त सरसकट मोबदला (बोनस) दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार, परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी माडसांगवी येथील ग्रामपंचायत कार्यालयात बाधित शेतकऱ्यांच्या समस्या, शंका व सूचना जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष साधक-बाधक चर्चा बैठक पार पडली. या बैठकीस आमदार सरोज आहेर यांच्यासह महसूल, नगररचना, महापारेषण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नकाशे दुरुस्त करण्याचे आदेश; मोबदला थेट संयुक्त खात्यात

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, परिक्रमा मार्गासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी नगररचना विभागाने गटनिहाय जागांची प्रत्यक्ष तपासणी करावी. आवश्यक तिथे दुरुस्त्या व बदल करून सुधारित नकाशे तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, बाधित शेतकऱ्यांचा मोबदला सामूहिक गटांच्या बँकेतील संयुक्त खात्यामार्फत (Joint Account) पारदर्शकपणे वितरित करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी संयुक्तपणे मोबदला स्वीकारून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

द्राक्षबागा आणि वीजवाहिन्यांबाबत मोठा दिलासा

Advertisement

बैठकीत शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध तांत्रिक अडचणींवर जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या:

उच्चदाब विद्युत वाहिन्या: महापारेषणच्या प्रस्तावित उच्चदाब विद्युत वाहिनीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी, या वाहिनीचा समावेश आता परिक्रमा मार्गाच्याच 'उपयोगिता मार्गिकेत' (Utility Corridor) केला जाईल. यामुळे बाधित शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय घटणार आहे.

निर्यातक्षम द्राक्षबागा: निर्यातक्षम द्राक्षबागा बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेतला जात असून, दुसऱ्या टप्प्यात त्यांना योग्य व विशेष मोबदला दिला जाईल.

भूमिहीनांचे पुनर्वसन आणि सर्व्हिस रोड

परिक्रमा मार्गामुळे जे शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून विशेष आणि सकारात्मक नियोजन केले जात आहे. भविष्यातील नागरीकरणाचा विचार करता या मार्गाला जोडणारा सर्व्हिस रोड अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

यावेळी आमदार सरोज आहेर यांनी बाधित शेतकऱ्यांच्या समस्या मुद्देनिहाय जाणून घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले. बैठकीत शेतकऱ्यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली असून पुढील कार्यवाही सकारात्मक गतीने केली जाईल, असे आश्वस्त करण्यात आले.

Advertisement

Comments

No comments yet.