मनोहर शिंदे, (नाशिक) ११ जुलै - आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा आणि घाटांच्या बेकायदेशीर बांधकामाचा अत्यंत गंभीर मुद्दा समोर आला आहे. पत्रातील तांत्रिक चूक सुधारत, 'त्रिवेणी संगम' ऐवजी नंदिनी-गोदावरी संगम स्थळ आणि त्याखालील दासक घाट येथे सुरू असलेली सर्व घाट बांधकामे तातडीने बंद करण्यात यावीत, अशी आग्रही मागणी आता उच्च न्यायालयात (High Court) करणार असल्याचे प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी आणि याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी स्पष्ट केले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने नाशिक महानगरपालिका आयुक्तांना तातडीने उपाययोजनात्मक कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले आहे.
काय आहे संपूर्ण वाद आणि आक्षेप?
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीसाठी मनपाकडून सध्या नंदिनी आणि गोदावरी नदीच्या संगमावर मोठ्या प्रमाणावर घाटांचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी करण्यात आलेले तांत्रिक नियोजन अत्यंत चुकीचे आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
४ महिने थेट मैलायुक्त पाणी सोडणार: नंदिनी नदीचे संपूर्ण पात्र वर्षातील ८ महिने कृत्रिमरीत्या वळवून मलनिःसारण केंद्राकडे (STP) नेले जाते. मात्र, पावसाळ्याच्या ४ महिन्यांत हे सांडपाणी थेट कोणतीही प्रक्रिया न करता गोदावरीच्या पात्रात मुक्तपणे सोडून दिले जाते.
'नीरी' (NEERI) च्या नियमांचे उल्लंघन: पावसाळ्यात मैलायुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडण्याची ही पद्धत तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीची असून 'नीरी'च्या मार्गदर्शक सूचनांनुसार याला स्पष्ट मनाई (Strictly Prohibited) आहे. तसेच हा प्रकार उच्च न्यायालयाच्या आदेशांचे थेट उल्लंघन करणारा आहे.
न्यायालयाकडे 'या' प्रमुख मागण्या करणार:
याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदावरीच्या संवर्धनासाठी आणि भाविकांच्या आरोग्यासाठी न्यायालयात पुढील मागण्या मांडल्या जाणार आहेत:
१. नंदिनी-गोदावरी संगमावरील घाट आणि त्याखालील दासक घाट येथे सुरू असलेले काम तातडीने बंद करण्यात यावे.
२. प्रदूषित आणि मलजल मिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याने येथे शाही स्नानास (तसेच सामान्य स्नानास) पूर्णपणे बंदी घालण्यात यावी.
३. या परिसरात 'हे पाणी मलजल मिश्रित (दूषित) आहे' असे दर्शवणारे मोठे आणि स्पष्ट फलक (बोर्ड) लावण्यात यावेत, जेणेकरून भाविकांची फसवणूक होणार नाही.
कोट्यवधी भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न!
आगामी कुंभमेळा हा पावसाळ्याच्या कालावधीतच असण्याची शक्यता आहे. अशा वेळी ४ महिने थेट मैलायुक्त पाणी टाकळी संगमावर गोदावरी पात्रात सोडल्यास, देशभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या आणि स्थानिक नाशिककरांच्या आरोग्याला भयंकर धोका निर्माण होऊ शकतो. हा थेट सार्वजनिक आरोग्याचा आणि न्यायालयाच्या अवमानतेचा (Contempt of Court) विषय असल्याने आम्ही याविरोधात कायदेशीर लढा तीव्र करत आहोत.
– राजेश पंडित, याचिकाकर्ते
कुंभमेळा प्राधिकरणाचे मनपा आयुक्तांना निर्देश
या प्रकरणी अति. कुंभमेळा आयुक्त कमलाकर रणदिवे यांनी नाशिक मनपा आयुक्तांना पत्र पाठवून तात्काळ सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मलनिःसारण व्यवस्था (STP) ही मनपाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने या त्रुटींची तातडीने चौकशी करून उपाययोजना करावी, असे प्राधिकरणाने पत्रात स्पष्ट केले आहे.