श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड विकास आराखडा... भाविकांना मिळणार या सर्व सुविधा...

Share:
Main Image
Last updated: 12-Jul-2026

बीड, (प्रतिनिधी) १२ जुलै - हिंदू नाथ संप्रदायाचे आद्यपीठ आणि देशभरातील करोडो नाथभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड (सावरगाव घाट, ता. आष्टी) येथील तीर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखड्याला आता मोठी गती मिळणार आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गडाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या निधीबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि अंतिम निर्णय घेण्यात आला. तसेच भूसंपादनाचा सविस्तर प्रस्ताव त्वरित मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

भाविकांच्या मूलभूत सुविधा आणि मानवी दृष्टिकोनावर भर

पर्यटन आराखड्याची बारकाईने पाहणी करताना पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी विकासकामांमध्ये मानवी दृष्टिकोन ठेवण्याच्या सूचना दिल्या. गडावर येणाऱ्या दिव्यांग (अपंग) भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी खास आणि सुलभ सोयी-सुविधा निर्माण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच संपूर्ण गड परिसरात भाविकांसाठी चोवीस तास आरोग्य सुविधा आणि शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय तातडीने उपलब्ध करून देण्यास त्यांनी सांगितले.

१० लाख भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन ठरणार मुख्य केंद्र

बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, आद्यनाथ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज यांची संजीवन समाधी येथे असल्याने दरवर्षी फाल्गुन अमावस्या, ऋषीपंचमी आणि रंगपंचमी या उत्सवांना देशभरातून लाखो भाविक येतात. गडावरील दैनंदिन भाविकांची संख्या ६ हजारांच्या आसपास असते, मात्र विशेष उत्सवाच्या दिवशी ही संख्या थेट १० लाखांपर्यंत पोहोचते. त्यामुळे या विकास आराखड्यात भव्य वाहनतळ, वाहतूक कोंडी रोखणे आणि गर्दीचे चोख व्यवस्थापन या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

Advertisement

 प्रस्तावित विकास आराखड्याची प्रमुख वैशिष्ट्ये

प्रवेश व परिसर: भव्य महाद्वार, मुख्य मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि येणाऱ्या भाविकांसाठी प्रसन्न वातावरण निर्मिती.

आध्यात्मिक व शैक्षणिक: गडावर भव्य स्मारक, ऐतिहासिक संग्रहालय, अभ्यासिका, ध्यानकक्ष आणि व्हीआयपी सुविधांची उभारणी.

भाविकांचे कल्याण: हजारो भाविकांसाठी सुसज्ज प्रसादालय, राहण्यासाठी आधुनिक भक्त निवास, सुनियोजित दुकाने आणि गोशाळा.

परिसर सौंदर्य: गडावरील ऐतिहासिक 'देव तलावा'चे पुनरुज्जीवन, आकर्षक साईट व्ह्यूज आणि गडाकडे येणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.