मुंबई, (प्रतिनिधी) ८ जुलै - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, आज विधान भवन परिसरात राजकीय वर्तुळाला चक्रावून टाकणारी एक मोठी घडामोडी घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार तब्बल ३४ वर्षांनी विधान भवनात उपस्थित झाले होते. या ऐतिहासिक उपस्थितीदरम्यान, चालू कॅबिनेट बैठक अर्धवट सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट शरद पवार यांच्या कार्यालयात भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय चर्चांना प्रचंड उधाण आले आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या या नव्या संभाव्य राजकीय समीकरणांमुळे त्यांचे नातू आणि आमदार रोहित पवार पक्षात नाराज असून, ते 'वेगळी चूल' मांडण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक संकेत मिळत आहेत.
कॅबिनेट सोडून शिंदे-पवार गुफ्तगू; राष्ट्रवादीच्या आमदारांची धावपळ
मिळालेल्या माहितीनुसार, विधान भवनात कॅबिनेट बैठक सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक बैठक सोडून शरद पवार यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले. दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या भेटीत नेमके काय शिजले, हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही.
मात्र, या भेटीपाठोपाठ शरद पवार यांनी आपल्या पक्षातील प्रमुख आमदारांची तातडीची बैठक थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कार्यालयात बोलावली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, उत्तम जानकर, रोहित पाटील, अभिजीत पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएच्या वाटेवर? मंत्रिपदाची चर्चा!
गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ खासदार आणि आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. या मोठ्या पक्षांतरानंतर आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात यापूर्वीच गुप्त बैठक झाली आहे.
नव्या राजकीय समीकरणांनुसार आगामी काळात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना महत्त्वाचे मंत्रिपद दिले जाऊ शकते, अशीही दाट शक्यता वर्तवली जात आहे.
नातू नाराज? आजोबांच्या स्वागताला रोहित पवारांची दांडी!
तब्बल ३४ वर्षांनी विधान भवनात आलेल्या शरद पवार यांच्या स्वागतासाठी सर्वपक्षीय आमदारांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या ऐतिहासिक प्रसंगी त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी चक्क गैरहजेरी लावली. डोंबिवलीतील शिंदेसेनेच्या एका नगरसेवकावरील मारहाण प्रकरणाच्या आंदोलनाचे कारण देत त्यांनी ही दांडी मारली असली, तरी यामागे मोठी राजकीय नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
'रोहित पवार विचारधारेच्या मुद्द्यावर वेगळा मार्ग निवडणार?'
चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र पिंजून काढणारे रोहित पवार सध्या सरकारविरोधी आंदोलनांचा मुख्य चेहरा बनू पाहत आहेत. मात्र, पक्षात होणाऱ्या नव्या घडामोडींमध्ये आणि संभाव्य मंत्रिपदाच्या शर्यतीत आपला विचार होत नसल्याने ते प्रचंड नाराज आहेत. त्यांच्या एका निकटवर्तीयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "जर शरद पवार यांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर रोहित पवार शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेचा हवाला देत पक्षात मोठी बंडखोरी करू शकतात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते विरोधी बाकांवर राहून स्वतःची नवी संघटना किंवा रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत."