त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) ७ जुलै - आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका भाविकाची सोन्याची साखळी हातोहात लांबवल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी २३ ग्रॅम वजनाचे आणि सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे लॉकेट चोरून नेले असून, याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद सदाशिव सोमवंशी (रा. कमोदनगर, नाशिक) यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दर्शन आटोपून पालखीत झाले होते सहभागी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद सोमवंशी हे सोमवारी (दि. २९) देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे आले होते. त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर ते आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या रिंगणात आणि मिरवणुकीत आनंदाने सहभागी झाले.
गर्दीचा फायदा घेत मारला डल्ला
पालखी सोहळ्यात विठ्ठल नामाचा गजर सुरू असताना आणि भाविकांची मोठी गर्दी असताना अज्ञात चोरट्यांनी सोमवंशी यांना टार्गेट केले. भाविकांच्या गर्दीत घुसून भामट्यांनी सोमवंशी यांच्या गळ्यातील २३ ग्रॅम वजनाचे आणि सुमारे १ लाख ५८ हजार १९० रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट अत्यंत चालाखीने लांबवले. गळ्यातील साखळी गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
वारीतील गर्दीत भाविकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
पालखी सोहळ्यातील अथांग गर्दीत चोरटे सक्रिय झाले असून, भाविकांनी आपले दागिने आणि मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जायभावे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.