मुंबई, (प्रतिनिधी) ५ जुलै - लग्नसमारंभ, सार्वजनिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या २० लिटरच्या पाण्याच्या जारमधील (जारबंद पाणी) गुणवत्तेवर 'अन्न व औषध प्रशासनाचे' (FDA) थेट नियंत्रण नसल्याची धक्कादायक कबुली राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. उघड्या जारमधून विकले जाणारे पाणी कायद्याच्या तांत्रिक चौकटीत बसत नसल्याने ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आता स्वतंत्र कार्यपद्धती म्हणजेच 'एसओपी' (SOP) तयार करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना देण्यात आल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
नागपूरमधील देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी विधानसभेत जारमधील पिण्याच्या पाण्यात मिश्रित होणाऱ्या घातक घटकांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. लग्न किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमात जारमधील पाणी कृत्रिमरीत्या झटपट थंड करण्यासाठी काही पाणी पुरवठादारांकडून थेट ‘इथिलिन ग्लायकॉल’ या अत्यंत घातक रासायनिक द्रवाचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक मुद्दा आमदार बकाने यांनी निदर्शनास आणून दिला.
कायद्यातील तांत्रिक त्रुटीमुळे एफडीआय हतबल!
आमदार बकाने यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, "राज्यात जार किंवा बाटलीबंद पाणी थंड करण्यासाठी इथिलिन ग्लायकॉल वापरल्याच्या तक्रारी अद्याप शासनाकडे आलेल्या नाहीत. मात्र, राज्यात उघड्या जारमधून विकल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने 'अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६' अंतर्गत ‘अन्न’ या व्याख्येत येत नाहीत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) त्यांची थेट तपासणी केली जात नाही." या तांत्रिक त्रुटीमुळेच अशा पाण्याच्या पुरवठ्यासाठी स्वतंत्र 'SOP' तयार करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांना देण्यात आले आहेत.
तपासणीत पाण्याचे २० नमुने आढळले 'असुरक्षित'
राज्यात १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर उत्पादक कंपन्यांवर केलेल्या कारवाईची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे:
एकूण १८२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
विश्लेषणासाठी १७७ पाण्याचे नमुने घेण्यात आले.
त्यापैकी ११५ नमुने योग्य (प्रमाणित) आढळले.
१३ नमुने कमी दर्जाचे, तर ४ नमुने मिथ्याछाप (अयोग्य लेबलिंग) आढळले.
तब्बल २० पाण्याचे नमुने मानवी आरोग्यासाठी अत्यंत 'असुरक्षित' आढळले आहेत. (२५ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.)
नागरिकांसाठी टोल-फ्री क्रमांक जाहीर; जनजागृती मोहीम राबवणार
बाटलीबंद आणि जारच्या पाण्याच्या गुणवत्तेवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी एफडीआएने तपासणी सत्र सुरूच ठेवले आहे. जार किंवा बाटलीबंद पाण्याबाबत नागरिकांना काही शंका किंवा तक्रारी असल्यास त्यांनी थेट १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच प्रसारमाध्यमे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून याविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.