"नांगरे पाटील, सद्सद्विवेक बुद्धी गहाण टाकू नका!" राज ठाकरे कडाडले... आणखी कुणाला हाणले शालजोडे?

Share:
Main Image
Last updated: 27-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २७ जून - वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी एका हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) केलेल्या स्तुतिसुमनांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. "नांगरे पाटील यांच्या वर्दीचा खाकी रंग पोलीस दलाचा आहे असा आमचा समज होता, तो संघाच्या आधीच्या चड्डीच्या खाकीचा आहे हे आत्ता कळले," अशा बोचऱ्या शब्दांत राज ठाकरे यांनी नांगरे पाटलांवर तोफ डागली आहे. तसेच, जर संघाबद्दल इतकीच आपुलकी असेल, तर तात्काळ पोलीस सेवेचा राजीनामा देऊन संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सरकारी अधिकाऱ्यांची ही 'दुहेरी निष्ठा' सरकारला चालते का? असा सवाल केला आहे.

"राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये जा!"

राज ठाकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विश्वास नांगरे पाटील हे एक पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांची निष्ठा केवळ पोलीस दलाच्या कर्तव्याशी असायला हवी. निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते, याचे भान त्यांनी सोडले आहे.

"तुम्हाला संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचे असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसेही गेली अनेक वर्षे मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी 'पुनर्वसन हमी योजना' सुरू आहेच, तुमचेही पुनर्वसन होईल," असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

'त्या' हिंदू संमेलनांच्या हेतूवर उपस्थित केले प्रश्न

सध्या राज्यात भरवली जाणारी हिंदू संमेलने जरी अराजकीय दाखवली जात असली, तरी ती पूर्णपणे राजकीय आहेत, असा दावा राज ठाकरेंनी केला. "ही संमेलने भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू काय आहेत, याचा विचार केला तरी यामागचे हात कुठे आहेत हे कळेल. प्रत्येक राजकीय पक्षाला काय कार्यक्रम घ्यावेत हा त्यांचा विषय आहे, पण एका सरकारी नोकरीवर असणाऱ्या अधिकाऱ्याने तिथे जावे का, हा खरा प्रश्न आहे," असे ठाकरे म्हणाले.

Advertisement

२०१२ च्या मनसे मोर्चाचा दिला दाखला; सरकारला विचारला जाब

अधिकाऱ्यांच्या या कृतीवर सरकार गप्प बसून चुकीचे पायंडे पाडत असल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी २०१२ मधील एका घटनेची आठवण करून दिली. ते म्हणाले,

"२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात मनसेने काढलेल्या मोर्चात एका पोलीस कॉन्स्टेबलने मंचावर येऊन पोलिसांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल माझे अभिनंदन केले होते. त्यावर तत्कालीन सरकारने 'निष्पक्षता सोडली' म्हणून त्या कॉन्स्टेबलला सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्याबाबत घेणार का?"

"नांगरे पाटील, सद्सद्विवेक बुद्धी गहाण टाकू नका!"

शेवटी, विरोधी पक्षांचे आमदार-खासदार सध्या सत्तेच्या दबावाखाली आहेत का, अशी शंका व्यक्त करताना राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली की, जर सरकारी अधिकारीच निष्पक्ष राहिले नाहीत, तर जनतेने कोणाकडे बघावे?

"नांगरे पाटील तुम्ही एक चांगले, कार्यक्षम अधिकारी आहात. सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलेले हवेच आहे. परंतु, तुम्ही तुमची सद्सद्विवेक बुद्धी राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका," अशी आर्त विनंतीही राज ठाकरे यांनी नांगरे पाटील यांना केली आहे. या जाहीर पत्रकामुळे राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.