नागपूर, (प्रतिनिधी) २७ जून - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर प्रादेशिक युनिटने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात दोन दिवस राबवलेल्या एका अत्यंत धाडसी आणि आव्हानात्मक मोहिमेत वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी करणारे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत डीआरआयने 'मलबार जायंट स्क्विरल' (शेकरू) आणि 'इंडियन स्टार टोरटोईज' (कासव) यांसारख्या अत्यंत दुर्मिळ आणि संरक्षित वन्यजीवांची तस्करांच्या तावडीतून सुटका केली आहे. याप्रकरणी मुख्य तस्कराला अटक करण्यात आली आहे. बाजारपेठेत 'एक्झॉटिक पेट' (परदेशी पाळीव प्राणी) म्हणून आणि वन्यजीव संग्राहकांकडून (वाईल्डलाईफ कलेक्टर्स) असणाऱ्या मोठ्या मागणीमुळे या प्राण्यांची जंगलातून बेकायदेशीर शिकार करून तस्करी केली जात होती.
दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क आणि विजेविना मोहीम
डीआरआयच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २४ आणि २५ जून २०२६ रोजी श्रीकाकुलम शहरात एका संशयित व्यक्तीला अडवण्यात आले. त्याच्याकडून पिंजऱ्यात बंद असलेल्या चार मलबार जायंट स्क्विरल्स (शेकरू), एक इंडियन स्टार टोरटोईज (कासव) आणि चौदा रानकोंबडे जप्त करण्यात आले.
त्यानंतर आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, डीआरआयचे पथक श्रीकाकुलमपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या रायकुरडी या अतिदुर्गम गावातील जंगलात पोहोचले. तिथे खडतर भूप्रदेश, वीजपुरवठ्याचा अभाव आणि मोबाईल नेटवर्क नसतानाही अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवून 'स्मॉल इंडियन सिव्हेट' (जळमांजर/कस्तूरी मांजर) या प्रजातीची दोन पिल्ले शोधून काढली आणि त्यांची सुटका केली.
कायद्यानुसार सर्वोच्च संरक्षण
सुटका करण्यात आलेले मलबार जायंट स्क्विरल, स्मॉल इंडियन सिव्हेट आणि इंडियन स्टार टोरटोईज हे प्राणी 'वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२' च्या अनुसूची-१ (Schedule-1) मध्ये समाविष्ट आहेत. या कायद्यानुसार त्यांना भारतात सर्वोच्च दर्जाचे कायदेशीर संरक्षण असून त्यांची शिकार करणे, वाहतूक करणे किंवा व्यापार करणे हा अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.
जप्तीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जप्त केलेले सर्व प्राणी आणि अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीकाकुलम वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जनतेला सतर्क राहण्याचे 'DRI' चे आवाहन
अशा बेकायदेशीर व्यापारामुळे देशातील जैवविविधतेला आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होत आहे. म्हणूनच वन्यजीवांच्या तस्करीसंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास जनतेने तात्काळ कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधावा, असे आवाहन 'डीआरआय'ने केले आहे.