नाशिक, (प्रतिनिधी) २३ जून - नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम व आदिवासी भागातील 'हिवाळी पाडा' येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. निसर्गरम्य वातावरणात वसलेली ही शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रयोगशाळा ठरत असल्याचे सांगत मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे व उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले. विशेष म्हणजे, ही शाळा सकाळी ९ ते रात्री ९ अशा तब्बल १२ तास विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून, येथे वर्षभर सातत्याने विविध नावीन्यपूर्ण व कौशल्याधारित उपक्रम राबविले जातात.
अनुभवातून शिक्षणाचे धडे
शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता शेती, परसबाग, पर्यावरण संवर्धन, श्रमसंस्कार आणि प्रयोगात्मक शिक्षण यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे येथील शिक्षण अधिक आनंददायी, उपयुक्त आणि जीवनाभिमुख बनले आहे. व्हिडिओ कॉल दरम्यान शाळेतील उपक्रमशील शिक्षक केशव गावित उपस्थित होते. शिक्षणमंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अध्ययनाची माहिती घेतली; तसेच त्यांच्या आकलन क्षमतेचा आणि शैक्षणिक प्रगतीचा थेट आढावा घेतला. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, वाचनाची सवय आणि ज्ञानवृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
स्वच्छता अन् शिस्तीचा आदर्श
शाळेतील स्वच्छता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत शिक्षणमंत्र्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे व्यवस्थित कापलेले केस, स्वच्छ गणवेश, कापलेली नखे आणि सुंदर शालेय परिसर पाहून त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांची पाठ थोपटली. "स्वच्छता आणि शिस्त या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मूलभूत बाबी असून प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचे पालन करणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले.
राज्यासमोर आदर्श!
"दुर्गम भागातील हिवाळी पाडा शाळेने शिक्षण, स्वच्छता आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छ शाळा, शिस्तबद्ध विद्यार्थी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक, पालक आणि प्रशासनाने संयुक्तपणे कार्य करणे आवश्यक आहे. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावे, यासाठी असे थेट संवाद उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील."
— दादाजी भुसे, शालेय शिक्षणमंत्री