मुंबई, (प्रतिनिधी) १९ जून - राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला प्रचंड मोठा धक्का बसला असून, त्यांचे तब्बल ६ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. या खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला असून, त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना सादर केले आहे. विशेष म्हणजे, आज दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असतानाच हा राजकीय भूकंप झाला आहे. या धक्क्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातही मोठी बंडखोरी होणार असल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचे बोलले जात असून, या पडद्यामागील घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. एकाच वेळी ६ खासदारांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
आता शरद पवारांची 'तुतारी' फुटणार? धर्मरावबाबा आत्राम यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील या मोठ्या फुटीनंतर आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलर्ट मोडवर आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी एक नवा बॉम्ब टाकला आहे. शरद पवार यांच्या गटातील तब्बल ५ खासदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, असा थेट दावा त्यांनी केला आहे.
१२ डिसेंबरची डेडलाईन!
धर्मरावबाबा आत्राम यांनी थेट तारीख जाहीर करत म्हटले आहे की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ५ खासदार येत्या १२ डिसेंबरपर्यंत आमच्याकडे येऊ शकतात. केवळ खासदारच नाही, तर अनेक आमदारही आमच्या संपर्कात असून ते पक्षात येण्यास उत्सुक आहेत. जर त्यांना भविष्यात पुन्हा निवडून यायचे असेल, तर त्यांना सत्ताधाऱ्यांसोबत येऊन कामे करणे गरजेचे आहे."
"आम्ही ऑपरेशन करणार नाही, ते स्वतःच येतील..."
पक्षात घेण्यासाठी कोणतेही 'ऑपरेशन' करावे लागेल का? यावर बोलताना आत्राम म्हणाले, "आम्हाला कोणतेही ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही. ते स्वतःहूनच तुतारी सोडून आमच्याकडे येतील." या दाव्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंतर अजित पवारांची राष्ट्रवादीही शरद पवार गटाला खिंडार पाडणार का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सुनेत्रा पवारांची अमित शाह यांच्याशी भेट; चर्चांना उधाण
याच राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठ्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या बंडानंतर आता पवारांचा पक्ष फुटणार की शरद पवार आपले गड राखण्यात यशस्वी होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.