नाशिक, (प्रतिनिधी) १७ जून - भारतीय हवामान विभागाने यंदा ‘एल निनो’ परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे पर्जन्यमान कमी होण्याचा किंवा पावसात मोठा खंड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्हा कृषी विभागाने खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध केली आहे. जिल्ह्यात अपुऱ्या पावसावर घाईघाईने पेरण्या करणे पूर्णपणे टाळावे, किमान ७५ ते १०० मिमी पाऊस होऊन जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. यंदा "एकच पीक, एकच पेरणी आणि पावसावर पूर्ण अवलंबित्व" ही पद्धत पूर्णपणे बदलून शेतकऱ्यांनी हवामानाधारित आधुनिक शेती व्यवस्थापन करावे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नाशिकमधील खरिपाचे गणित आणि पावसाची चिंता
नाशिक जिल्ह्यात यंदा ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची, तर १ लाख हेक्टरवर फळबागांची लागवड अपेक्षित आहे.
प्रमुख पिके: मका (२.३६ लाख हेक्टर), सोयाबीन (९९ हजार हेक्टर), भात (९३ हजार हेक्टर), बाजरी (८० हजार हेक्टर) आणि भुईमूग (२४ हजार हेक्टर).
फळबागा: द्राक्ष (५६ हजार हेक्टर) आणि डाळिंब (२४ हजार हेक्टर).
चिंतेची बाब: मागील वर्षी १६ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यात २२६.६० मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १०.०९ मिमी पाऊस झाला होता. यंदा सरासरीच्या ९० टक्के (±५%) पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे.
कृषी विभागाच्या प्रमुख मार्गदर्शक सूचना: 'अशी' करा शेती
टप्प्याटप्प्याने पेरणी करा: संपूर्ण क्षेत्राची पेरणी एकाच दिवशी न करता टप्प्याटप्प्याने करावी, जेणेकरून पावसात खंड पडल्यास संपूर्ण पीक धोक्यात येणार नाही.
राखीव बियाणे ठेवा: दुबार पेरणीची वेळ आल्यास अडचण येऊ नये म्हणून प्रमाणित बियाण्यांचा अतिरिक्त साठा (विशेषतः सोयाबीनसाठी) जवळ बाळगावा.
आंतरपीक पद्धतीचा अवलंब: मोनोक्रॉपिंग ऐवजी तूर + सोयाबीन, बाजरी + तूर, कापूस + मूग अशी आंतरपीक पद्धत स्वीकारावी, जेणेकरून एका पिकाचे नुकसान झाल्यास दुसरे पीक आर्थिक आधार देईल.
कमी पाण्याच्या पिकांना प्राधान्य: कोरडवाहू भागात ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद आणि तीळ; तर डोंगराळ भागात नागली व वरई लागवड करावी.
'बीबीएफ' (BBF) तंत्रज्ञानाचा वापर: गादीवाफा पद्धतीने पेरणी केल्यास मुळांजवळ ओलावा टिकून राहतो. जिल्ह्यात ३४२ बीबीएफ यंत्रे उपलब्ध आहेत. यंत्र न मिळाल्यास पेरणी यंत्राची एक नळी बंद ठेवून उगवणीनंतर १५ दिवसांनी 'मृत सरी' काढावी.
पाणी साठवण आणि मल्चिंग: शेतात पावसाचे पाणी अडवण्यासाठी कंपार्टमेंट बंडिंग करावे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी पिकांचे अवशेष किंवा पेंढ्याचा वापर करून 'मल्चिंग' करावे.
फळबागांची अशी घ्या काळजी:
द्राक्ष: वाढरोधक संजीवकांची आणि बाष्परोधक केओलीनची फवारणी करावी. पाशवी/बगल फुटी ताबडतोब काढाव्यात. अन्नद्रव्ये जमिनीऐवजी फवारणीद्वारे द्यावीत.
डाळिंब: आंबे बहार धरलेल्या बागांना फळे तडकण्यापासून वाचवण्यासाठी दिवसाआड ठिबक सिंचनाने सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. तीव्र उन्हापासून बचावासाठी शेडनेट किंवा जुन्या साड्यांचा वापर करून सावली करावी. मडका सिंचन किंवा सलाईन बाटल्यांचा वापर करावा.
आंबा: नवीन लागवडीसाठी मडका सिंचन वापरावे. १% पोटॅशची फवारणी केल्यास झाडे दुष्काळी परिस्थितीत तग धरू शकतात.
कृषी विभागाचे यशाचे सूत्र:
मिश्र पीक पद्धती + कमी कालावधीचे वाण + पाणी साठवण + हवामानानुसार निर्णय = आजचे नियोजन, उद्याचे सुरक्षित उत्पादन आणि उत्पन्न.
शेतकऱ्यांनी दररोजचा अंदाज घेण्यासाठी 'महाॲग्री एआय' व इतर डिजिटल सेवांचा वापर करावा. तसेच केवळ शेतीवर अवलंबून न राहता पशुपालन, कुक्कुटपालन यांसारखे पूरक व्यवसाय करावेत, असे आवाहन रवींद्र माने यांनी केले आहे.