पुणे, (प्रतिनिधी) १७ जून - संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील चिमुरडीच्या अपहरण, बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या विकृतीचा आणि क्रूरतेचा अत्यंत भयानक थरार न्यायालयात समोर आला आहे. "नराधम आरोपी भीमराव कांबळे याने चिमुरडीचे केवळ अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार व हत्या केली नाही, तर तिच्या मृत्यूनंतरही तिच्या शवावर (प्रेतावर) अत्याचार केले," असा धक्कादायक दावा विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आज न्यायालयात केला. ससून रुग्णालयाचा शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) अहवाल न्यायालयात वाचून दाखवत त्यांनी हा वैद्यकीय पुरावा शाबीत केला असून, न्यायालयाने देखील याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. सध्या या संवेदनशील खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.
तपास अधिकाऱ्यांची साक्ष देताना दाटला कंठ
आज न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे सायबर तज्ज्ञांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर या खटल्यातील अंतिम साक्षीदार तथा मुख्य तपास अधिकारी यांची साक्ष नोंदवण्याचे काम विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि त्यांचे साहाय्यक वकील प्रथमेश शिंगणे यांनी केले.
मुख्य तपास अधिकाऱ्यांनी तपासातील खालील महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले:
प्रकरणाशी संबंधित सर्व शासकीय पत्रव्यवहार आणि घटनास्थळाचे 'सीसीटीव्ही फुटेज'.
चिमुरडीवर झालेले अनैसर्गिक अत्याचार, तिच्या मृत्यूचे नेमके कारण आणि ससून रुग्णालयाचे वैद्यकीय दाखले.
नराधम आरोपीने मृतदेहाची केलेली विटंबना.
हे सर्व पुरावे आणि क्रूरतेचे तपशील न्यायालयासमोर सादर करताना खुद्द मुख्य तपास अधिकाऱ्यांचा कंठ दाटून आला होता.
पुढील न्यायालयीन प्रक्रिया कशी असेल?
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार पक्षातर्फे अंतिम साक्षीदाराची साक्ष नोंदवण्याचे कामकाज उद्यापर्यंत (बुधवार) संपण्याची दाट शक्यता आहे. हे कामकाज पूर्ण झाल्यानंतर लगेचच आरोपींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद (फायनल आर्ग्युमेंट) चालणार आहे.
सभागृहात शांतता: या खटल्याच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, आज न्यायालयात कामकाज सुरू असताना मूळ फिर्यादीचे (पीडित कुटुंबाचे) वकील ॲड. राधिका नावंदर-जोशी आणि श्री. पाडेकर हे देखील न्यायालयात उपस्थित होते. आरोपीला कठोरतम शिक्षा व्हावी यासाठी सरकारी पक्षाने न्यायालयात भक्कम पुराव्यांची साखळी उभी केली आहे.