अलिबाग, (प्रतिनिधी) १६ जून - उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी संपवून, मनात नवीन आशा-आकांक्षा आणि हातात नवीन वह्या-पुस्तके घेऊन रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. १५) उत्साहात शाळेत आपले पहिले पाऊल टाकले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि आकर्षक औंक्षणाने जिल्ह्याभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रवेशोत्सवाचा मुख्य सोहळा पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या ‘पीएमश्री शाळा वहाळ’ येथे पार पडला. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला, तसेच त्यांच्या हस्ते शाळेतील अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब‘ (IDEAL CENTER DIGITAL LAB) चे उद्घाटन करण्यात आले.
डिजिटल क्रांतीमुळे शिक्षकांना अध्यापन सोपे
डिजिटल लॅबच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी या अत्याधुनिक प्रयोगशाळेची प्रत्यक्ष पाहणी करत तिची कार्यपद्धती जाणून घेतली. या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) पद्धतीने आधुनिक शिक्षण मिळणार असून, यामुळे कठीण विषयही सोपे व रंजक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रणालीमध्ये सर्व वर्गांचा संपूर्ण अभ्यासक्रम आधीपासूनच उपलब्ध असल्याने शिक्षकांच्या वेळेची बचत होईल. तसेच, विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्याची विशेष सुविधा असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांमध्ये तांत्रिक कौशल्ये विकसित होतील. संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा लॅब उभारण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी घेतली चिमुरड्यांची शाळा!
या सोहळ्यातील सर्वात रंजक टप्पा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांसह इतर विद्यार्थ्यांशी साधलेला थेट संवाद ठरला. त्यांनी इयत्ता चौथी ‘अ’ आणि दुसरी ‘अ’ च्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची, वाचनाची आणि एकूणच शैक्षणिक प्रगतीची कौतुकाने माहिती घेतली. वहाळ येथील शाळेतील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट शिस्त आणि ज्ञानाची प्रगल्भ पातळी पाहून मुख्यमंत्र्यांनी मनापासून समाधान व्यक्त केले आणि शिक्षकांचे जाहीर कौतुक केले. खाजगी शाळांमधून नाव कमी करून पालक आता आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही!
"विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून, त्यांच्यात संवैधानिक मूल्ये, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. गावकरी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचा सक्रिय सहभाग हा शाळांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मुख्य कणा आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात केले.
बड्या मान्यवरांची मांदियाळी
या विशेष कार्यक्रमास माजी खासदार रामशेठ ठाकूर, शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, आमदार विक्रांत पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्याभरात अधिकाऱ्यांच्या भेटी; वह्या-पुस्तकांचे वाटप
प्रवेशोत्सवाचे हे चैतन्य संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळाले. मुख्य कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उरणमधील उलवे येथील शाळेला भेट दिली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी नवगाव (अलिबाग), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी पळस्पे (पनवेल) तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी चांभारगणी बुद्रुक (पोलादपूर) येथील शाळांना भेटी देऊन विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित केले. या सोहळ्यात सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके आणि सुंदर गणवेशाचे वाटप करण्यात आले. या शाळा प्रवेशोत्सवाचे अतिशय नीटनेटके नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.