नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १६ जून - येत्या २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या 'नीट' (NEET UG) पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अतिशय कडक पावले उचलली आहेत. परीक्षेची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि पेपरफुटी तसेच फसवणुकीचे रॅकेट रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 'टेलिग्राम' (Telegram) या लोकप्रिय मेसेजिंग ॲपवर २२ जूनपर्यंत अधिकृतपणे तात्पुरती बंदी घातली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) थेट शिफारशींनुसार केंद्र सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
'आयटी ॲक्ट'च्या आपत्कालीन अधिकारांचा वापर
एनटीएने (NTA) प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) या प्लॅटफॉर्मवर कठोर आणि कालबद्ध निर्बंध लागू केले आहेत. यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९अ (Section 69A of IT Act) अंतर्गत असलेल्या आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्यात आला आहे. परीक्षेबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषतः टेलिग्रामसारख्या ॲप्सवर कोणतीही संशयास्पद हालचाल होऊ नये, यासाठी शिक्षण मंत्रालय आणि एनटीए संपूर्ण लक्ष ठेवून आहे.
महत्त्वाचे निर्बंध आणि कालावधी:
पूर्ण बंदी (२२ जून २०२६ पर्यंत): भारतातील टेलिग्राम प्लॅटफॉर्मवरील सार्वजनिक प्रवेश २२ जून २०२६ पर्यंत पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे. यामध्ये 'नीट' परीक्षेच्या आधीचे, परीक्षेच्या दिवशीचे आणि परीक्षेनंतरचे अत्यंत महत्त्वाचे दिवस समाविष्ट आहेत.
एडिटिंग सुविधेवर गदा (३० जून २०२६ पर्यंत): टेलिग्रामवर पूर्वी पोस्ट केलेल्या कोणत्याही मेसेजमध्ये फेरबदल (Edit) करता येऊ नये, यासाठी या प्लॅटफॉर्मची 'एडिटिंग सुविधा' ३० जून २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पारदर्शकतेसाठी कठोर पाऊल:
'नीट' परीक्षेच्या विश्वासार्हतेवर कोणताही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये आणि कोणत्याही गैरप्रकाराला थारा मिळू नये, याच मुख्य उद्देशाने सरकारने डिजिटल माध्यमांवर हे तात्पुरते पण कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे पेपरफुटी करणाऱ्या टोळ्यांचे नेटवर्क पूर्णपणे मोडीत निघेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.