नाशिक, (प्रतिनिधी) १५ जून - चालू वर्षात ‘अल निनो’च्या (El Nino) प्रभावामुळे पावसाचे वितरण अनियमित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी पारंपरिक शेतीला फाटा देत, हवामानाधारित आणि शाश्वत पीक नियोजनाचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिकचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. प्रकल्प संचालक काशिद यांनी पत्रकात म्हटले आहे की, अल निनोच्या प्रभावामुळे यंदा काही भागांत पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसात दीर्घ खंड पडणे किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य जोखीम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
जोखीम टाळण्यासाठी ‘हे’ करा नियोजन:
प्रमाणित वाणांची निवड व बीजप्रक्रिया: खरीप हंगामासाठी पीक नियोजन करताना प्रमाणित व उपयुक्त वाणांचीच निवड करावी आणि बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
आंतरपीक पद्धतीवर भर: सोयाबीन, मूग, बाजरी, तूर यांसारख्या पिकांसाठी स्थानिक हवामानास अनुरूप शिफारस केलेल्या वाणांची निवड करून आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
पर्यायी नियोजन सज्ज ठेवा: उपलब्ध ओलावा लक्षात घेऊनच पेरणी करावी. पावसात खंड पडल्यास पुनर्पेरणीची वेळ येऊ नये, यासाठी कमी कालावधीत येणारी व दुष्काळ सहन करणारी पिके निवडून पर्यायी पीक नियोजन तयार ठेवावे.
पाणी व जमिनीचे व्यवस्थापन:
ज्या भागांत पाणीटंचाईची शक्यता आहे, तेथे कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सरी-वरंबा पद्धत, आच्छादन (मल्चिंग), सेंद्रिय खतांचा वापर, जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवण यांसारख्या उपाययोजनांचा प्रभावी वापर करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
‘खत बचावो’: नैसर्गिक पर्यायांवर भर द्या
रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे मृदा परीक्षणानुसारच रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक व जैविक निविष्ठांचा वापर वाढवावा, असे आवाहनही या पत्रकात करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि विद्यापीठांच्या शिफारशींनुसार हवामान आधारित सल्ल्यांचे पालन करावे. हवामान अंदाज आणि आपत्कालीन पीक नियोजनाच्या अधिक माहितीसाठी आपल्या भागातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांनी केले आहे.