नाशिक, (प्रतिनिधी) १४ जून - मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या आणि राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा छडा लावण्यात नाशिक पोलिसांना मोठे यश आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने शनिवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास पंडित कॉलनी मार्गावर सापळा लावून गुटख्याची बेकायदा वाहतूक करणारी कार पकडली. या कारवाईत दोन तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, कारसह एकूण ५ लाख २ हजार ६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तब्बल नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.
गुजरातच्या 'सुतारपाडा' लिंकचा खुलासा
गुजरात राज्याच्या सीमाभागात असलेल्या सुतारपाडा येथून एका कारद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा नाशिक शहरात विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खबऱ्याकडून कारचा क्रमांकही मिळाल्याने पोलिसांच्या पथकाने शनिवारी पहाटे शहरातील वेगवेगळ्या संवेदनशील भागात सापळा रचला होता.
पंडित कॉलनी भागात नाकाबंदी करत असताना अंमलदार प्रशांत मरकड, रवींद्र आढाव, संदीप भांड, प्रदीप म्हसदे व पथकाने संशयित कार अडवली. कारची झडती घेतली असता, त्यात पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या गोण्यांमध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.
नाशिकमधील 'हे' बडे भागीदार आले रडारवर
पोलिसांनी कारमधील संशयित चेतन गोविंद मुसळे (वय ४६, रा. सिडको, नाशिक) आणि प्रदीप भाऊसाहेब वल्टे (वय ३५, रा. मखमलाबाद, नाशिक) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यांनी दिलेल्या कबुलीनुसार, हा माल त्यांनी गुजरातच्या सुतारपाडा येथील 'सुनील' नावाच्या दुकानदाराकडून आणला होता.
विशेष म्हणजे, हा गुटखा नाशिकमधील त्यांचे भागीदार संशयित गोट्या सानप, यमराज गायकवाड, इरफान तांबोळी, अमोल मुळे, मंगेश पाटील आणि धनंजय लोखंडे यांच्या सांगण्यावरून शहरात किरकोळ विक्रीसाठी पोहोचवला जाणार होता. या खुलाशामुळे नाशिकमधील गुटखा विक्रीचे मोठे जाळे समोर आले आहे.
गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल
मानवी आरोग्याला कमालीचा घातक असलेल्या आणि कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या या प्रतिबंधित पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री केल्याप्रकराणी सर्व ९ संशयितांवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयीन आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.