जळगाव, (प्रतिनिधी) १४ जून - बाजारातून आणलेल्या अप्रमाणित आणि अनोंदणीकृत पशुखाद्यामुळे एकाच वेळी ३५ गाई-म्हशींना तीव्र अन्नबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील गालापूर येथे घडली. अनेक जनावरांची प्रकृती चिंताजनक बनल्याने पशुपालक हवालदिल झाले होते. मात्र, शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या ‘१९६२’ या आपत्कालीन फिरत्या पशुवैद्यकीय हेल्पलाइनने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे सर्व ३५ जनावरांचे प्राण वाचवण्यात यश आले असून, एक मोठी संभाव्य आर्थिक व जीवितहानी टळली आहे. गालापूर येथील पशुपालक हमीर गबाजी गवळी यांच्या गोठ्यातील जनावरांना हा विषबाधेचा फटका बसला होता.
संकटसमयी '१९६२' चा मिळाला आधार
काही गाई व म्हशींची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याचे पाहून पशुपालक हमीर गवळी यांनी तात्काळ '१९६२' या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला. ही आपत्कालीन सेवा भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाते.
पुणे येथील राज्यस्तरीय कॉल सेंटरच्या टीमने घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता क्षेत्रीय स्तरावरील फिरते पशुवैद्यकीय पथकाचे डॉ. यशवंत धावसे यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली.
दुर्गम भागात अवघ्या दीड तासात वैद्यकीय पथक हजर
कॉल सेंटरवरून संदेश मिळताच डॉ. यशवंत धावसे यांनी आपले सहकारी पशुधन पर्यवेक्षक सुदर्शन पाटील आणि वाहनचालक भूषण कोळी यांच्यासह अवघ्या दीड तासात दुर्गम भागातील गालापूर गाठले. पथकाने तत्परतेने बाधित जनावरांची तपासणी करून युद्धपातळीवर उपचार सुरू केले. योग्य निदान आणि औषधोपचारामुळे सर्व ३५ गाई-म्हशींना नवसंजीवनी मिळाली. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त डॉ. योगेश महाले आणि डॉ. पी. आर. पारखी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
असा केला तत्काळ उपचार...
"पशुधनाने अप्रमाणित पशुखाद्य खाल्ल्यामुळे ही विषबाधा झाली होती. आम्ही तात्काळ बाधित पशुधनावर सोडियम बायकार्बोनेट, चारकोल, अट्रॉपीन सल्फेट, आर.एल., सी.पी.एम. आणि बी-कॉम्प्लेक्स या औषधींद्वारे उपचार सुरू केले. सलग चार दिवस देखरेख आणि उपचार केल्यामुळे आता सर्व पशुधन पूर्णपणे सुरक्षित आहे."
— डॉ. यशवंत धावसे, फिरते पशुवैद्यकीय पथक (१९६२), एरंडोल.
पशुपालकांनो, आपत्कालीन स्थितीत १९६२ वर संपर्क करा!
या यशानंतर पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. किरण पाटील (IAS) यांनी राज्यातील सर्व पशुपालकांना आवाहन केले आहे. "१९६२ ही आपत्कालीन सेवा राज्यातील पशुपालकांसाठी वरदान ठरत आहे. पशुधनाच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. जनावरांच्या आरोग्याबाबत कोणतीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास पशुपालकांनी तात्काळ १९६२ या क्रमांकावर संपर्क साधावा," असे त्यांनी स्पष्ट केले.