सुनेत्रा पवारांची रिक्त जागा... राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी... कोण आहेत ते?

Share:
Main Image
Last updated: 08-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ८ जून - राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पक्षाने अखेर उमेदवाराची घोषणा केली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ व निष्ठावान नेते राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. या घोषणेपूर्वी मुंबईत महायुती आणि राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मंत्री छगन भुजबळ यांच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दिल्ली हायकमांडकडून आलेल्या निरोपावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

कोण आहेत राजेंद्र जैन?

विदर्भातील मजबूत चेहरा: राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान नेते आणि विदर्भातील पक्षाचे प्रमुख संघटक मानले जातात.

प्रफुल पटेलांचे निकटवर्तीय: ते पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी आहेत.

अनुभवी नेतृत्व: यापूर्वी त्यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून काम पाहिले आहे. तसेच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (GDCC) अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. पक्षाचे विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणूनही त्यांचा दांडगा अनुभव आहे.

'नवनीत राणा' हा विषय राष्ट्रवादीकडून संपला!

Advertisement

सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, सुनील तटकरे यांनी ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली. "नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता संपला आहे," असे सांगत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.

रोहित पवारांच्या टीकेला तटकरांचा पलटवार: "आम्हाला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही"

या सर्व घडामोडींवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला होता. "या जागेवर छगन भुजबळ यांना संधी दिली पाहिजे. जर ही जागा भाजपने सुचवलेल्या किंवा भाजपच्या व्यक्तीला दिली, तर पूर्ण राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या चरणी गेला किंवा दिल्लीसमोर झुकला, असा संदेश जाईल," अशी टीका रोहित पवारांनी केली होती.

या टीकेला सुनील तटकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. तटकरे म्हणाले:

"आमच्या पक्षात उमेदवारी कोणाला द्यावी, याबाबत आम्हाला रोहित पवारांच्या सल्ल्याची अजिबात गरज नाही. त्यांनी त्यांचे सल्ले आधी स्वतःच्या पक्षात द्यावेत. त्यांच्या पक्षाचे संख्याबळ कसे वाढेल, यावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित करावे!"

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.