मुंबई, (प्रतिनिधी) ७ जून - मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला, तरी तो अद्याप सर्वदूर सक्रिय झालेला नाही. हवामानाच्या सध्याच्या अंदाजानुसार, किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी राहण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक व व्यापक पावसाची शक्यता कमी असल्याने, शेतकरी बांधवांनी तूर्तास पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
दक्षिण कोकणात ९ जूनपर्यंत जोर; उर्वरित महाराष्ट्रात केवळ 'विखुरलेला' पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये आगामी ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल संथ गतीने होणार आहे.
सध्याच्या हवामान स्थितीनुसार, किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये केवळ दुपारनंतर ढग जमा होऊन विखुरलेल्या (Scattered) स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस स्थानिक पातळीवर वादळी स्वरूपाचा असेल, त्यामुळे तो संपूर्ण क्षेत्रात एकाच वेळी पडणार नाही. परिणामी, हा पाऊस खरिपाच्या पेरणीसाठी पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही.
उन्हाचा चटका कायम; विदर्भ-खानदेशात पारा ४० अंशांच्या पार!
मान्सून दाखल झालेला असला, तरी राज्यावरील उन्हाचा तडाखा तूर्तास कमी झालेला नाही. किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च पातळीवर राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भ व खानदेश: कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा: या भागात कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कृषी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नागरिकांना - शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन:
राज्यात निर्माण झालेल्या या खंडित हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खालील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत:
पेरणीबाबत: आगामी काळात होणाऱ्या केवळ विखुरलेल्या किंवा वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये. जमिनीमध्ये पुरेशी ओल आणि सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याचा धोका संभवतो.
विजांपासून संरक्षण: दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने, विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी मोकळ्या जागेत, झाडाखाली किंवा टिनशेडखाली थांबणे पूर्णपणे टाळावे.
विद्युत उपकरणांपासून दूर राहा: सुरक्षेच्या दृष्टीने वीज चमकत असताना विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या (Power Lines) जवळ उभे राहू नये.