नंदुरबार, (प्रतिनिधी) ७ जून - केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या २९ व्या ‘राष्ट्रीय ई-सुशासन पुरस्कार २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्याने देशात आपले अव्वल स्थान सिद्ध करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यंदाच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन महत्त्वपूर्ण डिजिटल उपक्रमांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ‘ई-आरोग्य धमनी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, त्यासोबतच पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
प्रशासनातील गतिमानता, पारदर्शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा तळागाळातील नागरिकांपर्यंत झालेला प्रभावी विस्तार या कडक निकषांवर यंदाच्या पुरस्कारांची निवड करण्यात आली आहे. देशभरातून निवड झालेल्या एकूण १७ महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये महाराष्ट्रातील तीनही प्रकल्पांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या पुरस्कारांमध्ये प्रथमच 'ग्रामपंचायत' या स्वतंत्र श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे.
दुर्गम भागातील संजिवनी: नंदुरबारची ‘ई-आरोग्य धमनी’
नंदुरबार जिल्ह्यातील अतिशय दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातील नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘ई-आरोग्य धमनी’ हा उपक्रम सुरू केला आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आरोग्य यंत्रणा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांची केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च दखल घेतली आहे. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील आरोग्य वितरणात क्रांती घडून आली आहे.
सुवर्ण विजेत्यांना १० लाख, तर रौप्य विजेत्यांना मिळणार ५ लाखांचे बक्षीस
या राष्ट्रीय पुरस्कारांतर्गत विजेत्या संस्थांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित केले जाईल. यामध्ये सुवर्ण (Gold) पुरस्कार विजेत्या संस्थांना १० लाख रुपये, तर रौप्य (Silver) पुरस्कार विजेत्या संस्थांना ५ लाख रुपयांची प्रोत्साहनपर रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही पुरस्काराची रक्कम सार्वजनिक कल्याणविषयक प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी आणि ग्रामीण-नागरी भागातील डिजिटल संसाधनांमधील तफावत दूर करण्यासाठी उपयोगात आणता येणार आहे.
राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या २९ व्या राष्ट्रीय ई-शासन परिषदेदरम्यान (National e-Governance Conference) भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या या त्रिमूर्ती उपक्रमांमुळे राज्याच्या प्रशासकीय शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.