नाशिक, (प्रतिनिधी) ४ जून २०२६
जिल्ह्यातील उद्योगांनी किरकोळ पेट्रोल पंपांवरून होणारी व्यावसायिक इंधन खरेदी तत्काळ थांबवून शासन निर्णयानुसार थेट तेल कंपन्यांसमवेतचे अधिकृत खरेदी करार पुनर्संचयित करावेत, अशी कडक सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे. तसेच तेल कंपन्यांनी किरकोळ विक्री केंद्रांवर नियमांचे पालन सुनिश्चित करत थेट खरेदी करणाऱ्या औद्योगिक ग्राहकांना विनाविलंब इंधन उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याची सद्य:स्थिती समजून घेणे, उद्योगांच्या अडचणी जाणून घेणे तसेच उद्योग व तेल कंपन्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी एका विशेष 'उद्योग संवाद' बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांच्यासह आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख तेल कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पेट्रोल पंपांवरील विक्रीत ३६% वाढ; औद्योगिक खरेदी घटली!
बैठकीत जिल्ह्यातील इंधन विक्रीची आकडेवारी समोर आली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा किरकोळ पेट्रोल पंपांवरील विक्रीत ३६ टक्के वाढ झाली आहे, तर औद्योगिक घाऊक खरेदीत तब्बल ५० टक्क्यांची घट झाली आहे. अनेक उद्योग थेट कंपन्यांकडून इंधन घेण्याऐवजी किरकोळ पंपांवरून इंधन उचलत असल्याचे यावरून स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी किरकोळ पेट्रोल पंपांवरून इंधन उचलण्याऐवजी 'दि मोटार स्पिरीट ॲण्ड हायस्पीड डिझेल आदेश', राज्य शासनाचा १९ जुलै २०११ चा शासन निर्णय आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तेल कंपन्यांच्या थेट अधिकृत वाहिनीद्वारेच (Direct Channel) इंधन खरेदी करणे बंधनकारक आहे.
औद्योगिक संघटनांकडून सहकार्याची ग्वाही
प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेला नाशिकमधील विविध उद्योग संघटना आणि तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शासकीय नियमांचे व शासन निर्णयांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी दिली.
शेतकरी व सर्वसामान्यांसाठी इंधन पुरवठा खंडित होणार नाही
"आगामी खरीप हंगाम आणि तातडीच्या गरजा पाहता जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत कमी पडणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेवर आणि जिल्ह्यातील इंधन वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या विशेष तपासणी पथकांद्वारे प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल."
— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक