नाशिक, (प्रतिनिधी) ३ जून - "आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरात सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प केवळ कुंभमेळ्यापुरते मर्यादित नसून ते दीर्घकालीन उपयोगाचे ठरणार आहेत. त्यामुळे या कामांचा वेग आणि गुणवत्ता या दोन्ही बाबींना समान महत्त्व दिले पाहिजे," असे स्पष्ट प्रतिपादन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज येथे केले. शहरातील विविध प्रकल्पांच्या गुणवत्तेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्राधिकरणाकडून विशेष भर दिला जात असून, याच अनुषंगाने आयुक्तांनी आज 'त्रयस्थ गुणवत्ता नियंत्रण' (TPQC) प्रयोगशाळेला अचानक भेट देऊन कामाचा सविस्तर आढावा घेतला.
कामाच्या ठिकाणी अचानक तपासणी होणार
या भेटीदरम्यान आयुक्त शेखर सिंह यांनी प्रयोगशाळेतील सुविधा, साहित्य तपासणी प्रक्रिया, काँक्रिट गुणवत्ता चाचण्या आणि अहवाल प्रणालीची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रकल्पस्थळी वेळेत आणि प्रभावीपणे गुणवत्ता तपासणी करता यावी, यासाठी 'मोबाईल टेस्टिंग लॅब' (फिरती प्रयोगशाळा) सुविधा तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. नियमित तपासण्यांबरोबरच आता विविध कामांच्या ठिकाणी अचानक (सरप्राईज विझिट) गुणवत्ता तपासणी करून कामांचा दर्जा कायम राखण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देखरेख यंत्रणा सक्षम करण्यासाठी आयुक्तांचे कडक निर्देश:
पारदर्शक नोंद प्रणाली: प्रत्येक चाचणीचे अहवाल, निष्कर्ष, तारीख आणि स्थळ यासह सविस्तर नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात, जेणेकरून परीक्षण प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.
तांत्रिक मानकांचे पालन: काँक्रिटच्या गुणवत्तेबाबत करण्यात येणाऱ्या चाचण्या मंजूर डिझाईन मिक्स आणि तांत्रिक मानकांनुसारच झाल्या पाहिजेत.
त्रुटी वेळेत सुधारा: गुणवत्ता नियंत्रण ही केवळ अंतिम टप्प्यातील प्रक्रिया नसून काम सुरू झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर राबविण्याची जबाबदारी आहे. यंत्रणांनी संभाव्य त्रुटी वेळेत ओळखून सुधारणा कराव्यात.
त्रिसूत्रीचा समन्वय: कंत्राटदार, सल्लागार संस्था आणि देखरेख करणाऱ्या शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवून प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता सुनिश्चित करावी.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी नियोजित विविध पायाभूत सुविधा आणि नागरी कामे वेळेत, दर्जेदार आणि दीर्घकालीन उपयोगाची व्हावीत, यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून आता नियमितपणे अशा प्रकारच्या प्रत्यक्ष स्थळ तपासण्या केल्या जाणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.